मोती तलाव परिसरात लोंबकळणारा 'इलेक्ट्रिक बॉक्स' धोकादायक

Edited by: विनायक गांवस
Published on: August 31, 2025 12:42 PM
views 54  views

सावंतवाडी : सावंतवाडीच्या मोती तलाव काठावरील उप जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या लोटस लॅम्पाचा एक इलेक्ट्रिक बॉक्स धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहे. पादचारी मार्गावर हा ४१५-४४० व्होल्टचा बॉक्स लोंबकळत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. 

नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. रुग्णालय आणि तलावाकडे जाणाऱ्या अनेक नागरिकांची ये-जा याच मार्गावरून असते. तसेच मॉर्निंग वॉक, इव्हीनिंग वॉकसाठी नागरिक या पादचारी मार्गाचा वापर करतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी लोंबकळत असलेला हा हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बॉक्स कधीही अपघात घडवू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, राजकिय लोकांकडून शुभेच्छा बॅनर लावताना या बॉक्सचा आधार घेतला जातो. यामुळेच तो इलेक्ट्रीक बॉक्स लोंबकळत असल्याच स्थानिकांचे म्हणणे आहे. या गंभीर धोक्याकडे नगरपरिषदने तातडीने कार्यवाही करून बॉक्स सुरक्षित रित्या बसवण्याची मागणी केली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना अधिक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.