
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात पडलेला अवकाळी पाऊस व त्या बरोबर सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यामुळे तालुक्यातील घोटगे, परमे वायंगणतड आदी भागात वादळी वाऱ्यामुळे या गावातील केळी बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जीवाचे रान करून उभ्या केलेल्या केळी बागायती अचानक पडलेल्या पावसामुळे जमीन दोस्त झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. केळी बागायतीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या घोटगे गावावर आता मोठे संकट कोसळले आहे.
त्यामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेऊन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घोटगे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसान भरपाई नमिळाल्यास दोडामार्ग येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी घोटगे शेतकऱ्यांनी दिला आहे.
मिळालेली माहिती अशी की दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसर व घोटगे परमे आदी गावांमध्ये रविवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे सोसाट्याचा वाराही सुटला आणि या वादळी पावसाने म्हणता म्हणता या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या 45 हजार हुन अधिक केळी जमीन दोस्त झाल्यात. घोटगे गावातील सर्व शेतकऱ्यांनी अहोरात्र करून उभ्या केलेल्या केळी बागायती भुई सपाट झाल्याने भरत दळवी, संदीप दळवी, विनय दळवी, नरेश काळबेकर, महेश दळवी, बाबा दळवी आदी शेतकऱ्यांना दुःख अनावर झाले.
यावेळी बोलताना संदीप दळवी म्हणाले की रक्ताचे पाणी करून उभ्या केलेल्या केळी बागायती आज ५ मिनिटात नष्ट झाल्या. देवा परमेश्वरा काय हे केलस काय आमच्याकडून एवढ पाप झाल होत ते तू अस केलस असे शब्द संदीप दळवी यांच्या तोंडून बाहेर पडले. भाडे करारावर घेतलेल्या जमिनी आणि त्यात उभी केलेली केळी बागायती आज नष्ट झाली देवा कस होणार रे बाबा अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, बोलताना शेतकरी भरत दळवी म्हणाले की घोटगे गाव हा केळी बागायतीवर आपली रोजी रोटी उभी करत असतो. केळी बागायती शिवाय दुसरे उदरनिर्वाहाचे सादन आमचं कडे नसल्याने आता आमच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. एकीकडे तिलारी पाटबंधारे विभागाने धरणाचे काम करण्यासाठी संपूर्ण धरणातील पाणी खाली केले. त्यामुळे आमच्या बागायती पाण्याविना कोरड्या पडल्या आणि आता त्यात हे वादळाचे संकट आले. आणि आमच्या तोंडचा घास हिरावून नेला यांच्या पेक्षा मोठं दुःख आम्हाला नाही असे भरत दळवी म्हणाले. ते बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होताना दिसले.