
राजापूर : हातातोंडाशी आलेल्या भात पिकाला परतीच्या पावसाने दृष्ट लावल्याने शेतकऱ्यांचा नजिकच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेतला आहे. परतीच्या पावसाने गेले आठ दिवस तालुक्याला चांगलाच दणका दिला आहे. यामुळे प्रचंड मेहनतीने हाताशी आलेले पीक वाया जात असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या नुकसानीकडे भरल्या डोळ्यांनी पाहाण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरलेला नाही.तर दुसरीकडे प्रधानमंत्री फसल विमा योजनातर्गत विमा उतरविलेला असतानाही संबधितांना अनेक वेळा संपर्क साधूनही दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रिंदावण येथील प्रगतशील शेतकरी सुरेंद्र पाटील यांनी अखेर तालुका कृषिकडे झालेल्या नुकसानीची पाहाणी करीत पंचनामा करीत नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी केली आहे.गेले काही दिवस झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे. सद्यस्थिती तालुक्यातील ९० टक्के भातशेती कापणीयोग्य झाली असून काही ठिकाणी कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. जागेवरच असल्याने पावसामुळे कोंब फुटले आहे. तर उभी असलेली शेतीला झोपवून टाकले आहे. दरवर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यंदा तालुक्यातील महाळुंगे गावातून मोठ्या नुकसानीच्या तक्रारी झाल्या आहेत.यामुळे काही शेतक-यांनी होणाऱ्या नुक नुकसानीपासून सुटकारा मिळावा, म्हणून प्रधानमंत्री फसल विमा योजनातर्गत विमा उतरविले आहेत. काही शेतकऱ्यांनी या विमा कंपनीशी संपर्क साधण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला असता फोन लागत नाही तर काही वेळा फोन लागल्यास अन्य ठिकाणी लागत असून अन्य भाषेत संपर्क साधला जात आहेत. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर कंपनीच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क साधला असता प्रयत्न केला असता त्यांच्याकडूनही समर्पक उत्तरे दिली जात नाहीत व ते मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहे, अशा तक्रारी झाल्या आहेत.प्रिंदावण येथील एका शेतकऱ्याने २४ जुलै रोजी विमा उतरविला आहे. मात्र झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नाही. त्यामुळे शासनाची ही योजना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे.