साळशीत मोकाट भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 26, 2024 13:50 PM
views 174  views

देवगड : देवगड तालुक्यातील साळशी गांवात सध्या भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ असून त्यांनी येथील होतकरू तरुण कुक्कुट पालन व्यवसायिक वैभव प्रकाश घाडी यांच्या पाळीव कोंबड्यांवर हल्ला करत सुमारे ६० पक्षी मारले. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गावांतील भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानी शुक्रवारी दुपारी अचानक पिंजरा तोडून कोंबड्यावर हल्ला केला. त्यावेळी कोंबड्यांचा जोरात आरडाओरडा ऐकून परिसरातील रहिवाशांनी धावपळ करून या भटक्या कुत्र्यांना पिटाळून लावले.

या घटनेनंतर वैभव प्रकाश घाडी यानी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सुमारे १० ते १५ हजारांचे नुकसान झाले आहे. या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव येथील मोटरचालक वाहनांना सुद्धा होत आहे. हे भटके कुत्रे मोटासायकलस्वार यांचा पाठलाग करतात. याबाबत ग्रामपंचायतकडून त्वरित उपाययोजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशीही मागणी वैभव घाडी यांनी केली आहे.