विजयदुर्ग किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूची तटबंदी ढासळली...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 17, 2023 17:20 PM
views 228  views

देवगड : विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.मात्र, याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या किल्ल्याच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात बांधलेल्या गड किल्ल्यांची चिरेबंदी इतकी वर्ष अभेद्य होती. परंतु, आज अनेक वर्षांचा कालखंड पार पडल्यावर, समुद्राच्या लाटांच्या माऱ्याने तटबंदी ढासळू लागली आहे. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूची तटबंदी लाटांच्या मारांमुळे ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे. विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.मात्र, याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या किल्ल्याच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज आहे. या दर्या बुरुजाच्या खालील तटबंदी समुद्राच्या महाकाय लाटांच्या आपटण्यामुळे ढासळली आहे. तटबंदीचा काहीसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

विजयुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. २ वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरुजाजवळील तटबंदी ढासळली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून किल्ल्याची डागडुजी करण्यात येईल, अशी फक्त तोंडी आश्वासन दिले होते; मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेल्या लोकप्रतिनिधींपैकी कोणीच  शासनदरबारी आवाज उठविला नसल्याने, अखेर त्यांचे पाहणी दौरे हे केवळ पर्यटनात्मक दौरेच ठरल्याचे बोलले जात आहे.

विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षांपूर्वी तटबंदी ढासळली होती. त्यावेळी माजी खासदार संभाजीराजे यांनीही प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती. त्यांनी देखील शासनदरबारी राजांच्या किल्ल्याची ताबडतोब डागडुजी होण्यासाठी आवाज उठविला होता. मात्र, या किल्ल्याच्या डागडुजीसाठी कोणतीही उपाययोजना शासन स्तरावरून झाली नसल्यामुळे  किल्ल्याची समुद्राच्या भागाकडील समुद्राच्या लाटांमुळे तटबंदी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर येत आहेत.