गव्यारेड्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने लावले सूचना फलक..!

Edited by:
Published on: April 08, 2024 14:13 PM
views 114  views

देवगड : देवगड शिरगाव चौकेवाडी फाट्यादरम्यान दुचाकीस्वाराला गव्याने उडवल्याची घटना ताजी असतानाच उशिरा का होईना वन विभाग आता मात्र अलर्ट मोडवर आले आहे. देवगड तालुक्यातील चाफेड, कुवळे, साळशीसह आयनल, भरणी परिसरात या वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याने वनकर्मचारी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गाववासीयांना 'जागते रहो'च्या दृष्टीने सजग करत आहे. दरम्यान गार्यामध्ये भल्यामोठ्या फलकाच्या माध्यमातून सावधगिरी बाळगण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. राधानगरीमधील दाजीपूर अभयारण्य गव्यांचे आश्रयस्थान होते. मात्र वाढती जंगलतोड आणि अन्न पाण्याच्या शोधात त्यांचे कळप कोकणात उतरले. सुरुवातीला वैभववाडी तालुक्यात स्थिरावल्यानंतर हळूहळू त्यांचा कळप मालवण, कुडाळ, देवगड तालुक्यात पसरला.पावसाळ्यात माळरानावर मिळणारा हिरवागार खुराक,भातशेती आणि उन्हाळ्यात वायंगणी पिकाबरोबरच आंबा,काजूचा हंगाम असल्यामुळे त्यांनी तळकोकणातच आपला मुक्काम कायम केला,सध्याच्या हंगामात देवगड येथील बागायतींमधून वारंवार शेतकऱ्यांना या रानगव्यांचे,बिबट्यांचे दर्शन होत आहे.दहा दिवसांपूर्वी शिरगाव चौकेवाडी फाटादरम्यान एका गव्याने रात्रीच्या सुमारासदुचाकीस्वाराला गाडीसहित फेकून दिले होते.चार दिवसांपूर्वी कुवळे मार्गावर काजू बागेत बिबट्या दिसल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.



अशा आहेत सूचना


■ रात्रीच्या वेळी बिबट्या जास्त सक्रिय असल्यामुळे एकट्याने घराबाहेर पडणे टाळा. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागे ठेवा. रात्रीच्या वेळी दरवाजा व्यवस्थितरीत्या बंद करा. अंगणात घराच्या बाहेर उघडधावर झोपणे टाळा. रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्धांना एकटे सोडू नका,


■ कळपाने असणारे हे गवे फारसा त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. मात्र एकटा फिरणाऱ्या वा गव्याकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वन विभागाने रात्रीच्या वेळी गस्ती घालताना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. काही संशयास्पद आढळल्यास त्वरित वन विभागाच्या १९२६ ला संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


■ एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा, मोठ्या आवाजात गाणी लावा. घराजवळ झाडेझुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा. ■ घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा ते न झाल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि त्याकडे बिबट्या आकर्षित होतो.