
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीमधील नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून ८ जणांची पथ विक्रेता समितीमध्ये निवड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त यांच्या आदेशानुसार पंचवार्षिक निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यक्रम वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी परितोष कंकाळ यांनी जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी हि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र पथविक्रेता नियम १०१६ मधील नियम १४ (२) अतंर्गत ८ नगरपथविक्रेता सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या आठ सदस्यांमध्ये सर्वसाधारण संवर्गाचे ३, अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती १. इतर मागासवर्ग -१, अल्पसंख्यांक १. विकलांग/दिव्यांग १ अशी एकूण ८ सदस्य पदे निवडण्यात येणार आहे.
त्यासाठी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. १९ व २० रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत नामनिर्देशन पत्राचे वाटप, २३ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत पत्रे स्वीकारण्यात येतील. २४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. त्यानंतर ५ वाजता उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. २५ रोजी सकाळी ११ ते सांय. ५ वा. हा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वा. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३० रोजी सकाळी ११ ते सांय. ५ वा. या वेळेत आवश्यक भासल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन बहुमत होणाऱ्या ८ सदस्यांची समिती घोषित करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत कसई-दोडामार्ग शहरातील पथविक्रेत्यांनी सहभाग घ्यावा, अधिक माहितीसाठी कसई- दोडामार्ग नगरपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.