युतीचा पहिला विजय सहकाराच्या माध्यमातून मिळवू

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास
Edited by: विनायक गांवस
Published on: November 08, 2022 15:19 PM
views 159  views

सावंतवाडी : भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या माध्यमातून खरेदी -विक्री संघाची निवडणूक जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग, विद्याधर परब यांच्या नेतृत्वाखाली लढू अन् जिंकू, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


 सावंतवाडी तालुक्याची खरेदी -विक्री संघाची निवडणूक जिल्हा बँकचे संचालक महेश सारंग, विद्याधर परब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. अनुभवी संचालक भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शेतकऱ्यांच्या अन् जनतेच्या हिताचा विचार आमच्या पॅनलन केला आहे. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा उद्देश आहे. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोघांची ताकद या पॅनल सोबत असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचही मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे जिल्ह्यात युतीचा पहिला विजय सहकाराच्या माध्यमातून मिळवू,  मोठ्या फरकाने युतीच पॅनल विजयी होईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


तर जेव्हा पक्ष एकत्र येत असतात त्यावेळी कार्यकर्ते देखील एकत्र येतात. त्यामुळे जर कोकणचा विकास होत असेल तर सर्वांनी एकत्र काम करावं लागेल. एकत्र काम करण्याची जर ही सुरुवात म्हणत असाल तर चांगली सुरुवात जिल्ह्यात होतेय असं मत मंत्री केसरकर यांनी राणे- केसरकर मनोमीलनाच्या प्रश्नांवर व्यक्त केल. तर विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाचा व्यक्त केलेला विश्वास पाहता सिंधुदुर्गच्या विकासाला निश्चित गती मिळेल.कोट्यवधीचा निधी मंजूर केला असून कामाला देखील सुरुवात झाली आहे. रत्नसिंधुची बैठक झाली असून ती काम देखील सुरू होत आहेत. तर नारायण राणेंच्या खात्याच्या  माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खात्याच्या माध्यमातून जनसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम झालं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जनतेला अपेक्षित असणारा विकास निश्चित होईल असं ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर बांदेकर उपस्थित होते.