
ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत कोकण नगर जोगेश्वरी मंडळाने यंदाची पहिली नऊ थराची सलामी दिली. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. दहीहंडी पथकाने नऊ थर रचल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त करत एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं.
यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले, “कोकण नगर पथकाने त्यांच्या दहीहंडीची सुरुवात येथेच केली आहे. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील शुभेच्छा आहेत. हिंदू सण टिकले पाहिजेत याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे.”
भांडूप व्हिलेज रोड येथेही मनसेकडून आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांची सलामी देण्यात आली. याबाबत मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर माहिती दिली. त्यात म्हटलं, “मुंबईतील भांडूप व्हिलेज रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी महोत्सवात जोगेश्वरी येथील ‘जय जवान’ गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली.”