कोलगावमध्ये १६ ते २० मे ला पडली उत्सव !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 09, 2024 14:04 PM
views 51  views

सावंतवाडी : कोलगाव ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव १६ ते २० मे दरम्यान संपन्न होत आहे. त्यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होईल. शुक्रवार १७ रोजी दुपारी २ वा. श्रीदेवी सातेरी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा येथे श्री दिर्बाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान व त्याठिकाणी धार्मिक विधी मानपान व नवसफेड कार्यक्रम होतील. रात्री ९ वा. महाप्रसाद व त्यानंतर श्री दिर्बाई देवी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा मंदिराकडे प्रस्थान व रात्री मुक्काम होईल.

 शनिवार १८ मे रोजी सकाळी १० वाजता अंधारांच्या हस्ते धार्मिक विधीयुक्त पडली भरणे व त्यानंतर भाविकांच्या पडलीत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ वा. अंधारांना हाक मारणे, भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलणे, सायंकाळी ५ ते ७ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ८ वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.

रविवार 19 मे रोजी सकाळी 10 वाजता सर्व अंधाराना हाक मारणे  व ओटी भरणे नवस बोलणे सायंकाळी ४ वाजता अंधाराना हाक मारणे  ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर आठ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

सोमवार २० रोजी सकाळी ओटी भरणे, ११ वा. सर्व अंधाराना हाक मारणे व रयतेला आशीर्वाद, ११ वा. महाप्रसाद, दुपारी २.३० वा. अंधाराना हाक मारणे व नंतर पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान होईल. भाविकांनी पडली सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीच्या वतीने व कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.