वझरेतील प्रसिद्ध गाडा उत्सव | भाविकांची तोबा गर्दी..!

रथोत्सवाला पंचक्रोशीबरोबरच गोवा राज्यातूनही लक्षवेधी उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2023 18:39 PM
views 261  views

दोडामार्ग : मेशांच्या जुलमी राजवटीचा बिमोड झालेनंतर वझरे गावात सुरू झालेली गाडा उत्सवाची परंपरा वझरेत होळीच्या तिसऱ्या दिवशी अमाप उत्साहात संपन्न झाली. लक्षवेधी होणाऱ्या या गाडा उत्सव रथोत्सवाला पंचक्रोशी बरोबरच लगतच्या गोवा राज्यातूनही ही लक्षवेधी परंपरा पहाण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी लोटली होती.


गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिमगोत्सव मधिल रितीरिवाज, पंरपरा आजही कोकणात जोपासल्या जात आहेत. त्यात खंड पडू दिला जात नाही, विशेष म्हणजे आजची आधुनिक युवा पिढी सुद्धा त्या जपत आहेत. वझरे गावात शिमगोत्सव काळात होळीच्या तिसऱ्या दिवशी साजरा होणारा गाडा उत्सव या आपल्या एतीहासिक परंपरा जोपासणारी असून बुधवारी मोठ्या उत्साहात हा गाडा उत्सव पार पडला. याच गाडा उत्सव तथा रथोत्सवाला हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 

तालुक्यातील वझरे गावात शेकडो वर्षांची गाडा उत्सवाची परंपरा आजही पूर्वीसारखीच जपली जात आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार फार पूर्वी या परिसरात मेशांची राजवट होती. सत्ता पैसा या जोरावर मेशे येथील स्थानिक लोकांचा छळ करीत. त्यांच्यावर जुलमी अत्याचार करत त्यांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त होण्यासाठी त्या काळातील स्थानिकांनी गनिमीकावा खेळला आणि मेशांचा नायनाट झाला. आणि तेंव्हापासून या आनंदाचे प्रतिक म्हणून हा शिमगोत्सव मध्ये गाडा उत्सव साजरा केला जात आहे .

वझरे येथील गाडा उत्सव निमित्ताने मंदिरात असलेली रथाची चाके जोडून रथ हार-फुलांनी तसेच आंब्याचे टाळ, विविध प्रकारचे रंगीबेरंगी कपड्यांनी सजवली जाते. नंतर हा रथ धार्मिक विधी पूजाअर्चा करण्यासाठी एका धार्मिक ठिकाणी नेऊन हे विधी पार पडतात. नंतर काही मंडळी या रथावर स्वार होतात. मग गावातील ग्रामस्थ नंतर या रथाला दोरखंड बांधून पारंपरिक रथ ओढणे या गाडा उत्सव सुरूवात करतात. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करतात. यावर्षी सुद्धा ही परंपरा करण्यात आली.

 वझरे गावात हा गाडा उत्सव सुरू होण्यापूर्वी विविध वाडीतील ग्रामस्थ रोंबाट घेऊन मंदीरात दाखल होतात. गावाचे रोंबाट वाजत गाजत मंदिरात दाखल होते. त्यानंतर मंदिराशेजारी उभ्या केलेल्या रथाची पूजा होते. काही लोकांना रथावर बसविण्यात आल्यावर गाडा ओढणीला सुरुवात होते. रस्सी खेचण्यासाठी दोन्ही बाजूने युवकांची मोठी कसरत व एक अनोखा रूढी पंरपंरां जोपासणारा खेळ भाविक याची देही याची डोळा अनुभवत असतात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी यावेळी सुद्धा हजारो भाविक उपस्थित होते. 


अशी आहे आख्यायिका..

 गावातील ग्रामस्थ यांच्यावर जुलमी अत्याचार करणाऱ्या मेशांचा नायनाट करण्यासाठी परिसरात गावातील पै पाहुणे याना एकञ केले. आणि योजना आखली, गावातील एका  महिलेला मोलकरीण म्हणून मेशांकडे पाठवण्यात आले. तिला सांगितल्या प्रमाणे तीने मेशांकडे असलेल्या बंदूका मध्ये पेज ओतली, त्यामुळे त्या निकामी झाल्या होत्या. हा संदेश मिळाला आणि काम फत्ते झाले. हे समजताच गावातील ग्रामस्थ यांनी हल्ला चढवून मेशांचा नायनाट करून त्यांची राजवट संपुष्टात आणली. तेव्हा पासून गाडा उत्सव रथोत्सव ही प्रथा सुरू झाली, असे जाणकार सांगतात.