तज्ञ न्यायाधीशास सिंधुदुर्ग मुकला

संतोष चव्हाण होते चालत बोलत ग्रंथालय
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 17, 2023 20:08 PM
views 880  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे सह - दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संतोष दत्ताराम चव्हाण यांच्या अकाली जाण्याने अत्यंत हुशार, तज्ञ न्यायाधीशास सिंधुदुर्ग जिल्हा मुकला आहे. मुळचे लांज्याचे असलेले संतोष चव्हाण यांनी खूप कमी वयात न्याय संबंधित अनेक बाबींमध्ये प्राविण्य प्राप्त केलं होत. चालत बोलत ग्रंथालय अशीच त्यांची ओळख होती. ओरोस येथे येण्यापूर्वी ते मुंबई येथील बांद्रा कोर्टात असताना  न्यायदानात उत्कृष्ट काम असल्याने त्यांना अत्यंत मानाचा राष्ट्रीय पद्म पुरस्कार मिळाला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हुशारीच कौतुक केलं होतं.

त्यापूर्वी ते मालवण येथे दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग एक म्हणूनही कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोपीना शिक्षा दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील विशेषतः मालवणमधील गुन्हेगारीला आळा बसला होता. त्याचा परिणाम आजही मालवण मधील गुन्हेगारीचे प्रमाण फार कमी झाले आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग म्हणून ज्यावेळी त्यांनी पदभार घेतला त्यावेळी  गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन होणे ही दुर्दैवी घटना आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाच्या इतिहासात कार्यरत असताना दुःखद निधन झालेले ते प्रथमच न्यायाधीश आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका, जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी, व देशमुख मॅडम मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती कारंडे मॅडम तसेच सर्व तालुका न्यायालयाचे न्यायाधीश साहेब जिल्ह्यातील वकील न्यायालयीन कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण उद्भवल्यास त्वरित  त्यांच्यापर्यंत पोहोचून आवश्यकता वाटल्यास आर्थिक मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत होते. कर्मचाऱ्यांच्या प्रति त्याच्या मनात खूप सहानुभूती व प्रेम होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा न्यायालयात ते वकील पाटकर यांचेकडे लिपिक म्हणून त्यांनी काम केले.  नंतर त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली व न्यायाधीशांची परीक्षा उत्तीर्ण झालेत. विशेषता वर्ग ४ कर्मचारी वर्गाचे ते आधार म्हणूनच होते. त्यांच्या अकाली जाण्याने सिंधुदुर्ग  व रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या घरातील एखादी व्यक्ती आपल्यातून सोडून गेली  असे वाटते. अशी भावना त्यांच्या प्रति सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक भाग्यवंत वाडीकर यांनी व्यक्त केली.