
सावंतवाडी : माहेरवाशिणींच्या गौराईच शुक्रवारी घरोघरी आगमन झालं. शहरातील सालईवाडा येथील एकत्रीत बांदेकर कुटुंबात वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने गौराई विराजमान झाली. मोठ्या हौसेनं गौरीला सजवत तिची पूजा केली. भाजी-भाकरीचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात आला.
गौरी-गणपतीच्या या सणाला कोकणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद चतुर्थीला लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर गौरीचं आगमन होत. काही भागात सुवासिनींकडून खडयाची, काही ठिकाणी पानांची तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा केली गेली. तालुक्यात ठिकठिकाणी महिलांमध्ये उत्साह दिसून आला.
भरजरी साडया नेसून आलेल्या सुवासिनींपासून ते मुलींपर्यंतचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. गौरी घरी आणाल्यानंतर त्यांची हळद- कुंकू, दुर्वा, फुलं, गिजवस्त्र यांनी पूजा केली गेली. वाजत-गाजत गौरीचे डहाळे घेऊन आलेल्या माहेरवाशिणींसह मुलींचे औक्षण करून सुवासिनींनी गौरीला विराजमान केले. पुजेनंतर झिम्मा फुगडी घालून गौरी जागवण्याची पद्धत असून घरोघरी महिला एकत्र येऊन झिम्मा फुगडीचा फेर धरत गौरी जागवणार आहेत. पुजेनंतर पूजा गोडाचा तर काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. काही भागात गौराईला तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. उद्या शनिवारी पाच दिवसांच्या श्री गणेशासोबत गौराईचेही विसर्जन केले जाणार आहे. गौरी-गणपतीच्या या सणामुळे शहरासह गावागावांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.