भल्ली भल्ली भावय..!

कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सवाचा उत्साह
Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 23, 2023 12:07 PM
views 148  views

देवगड : भल्ली भल्ली भावय... म्हणत खेळीमेळीच्या वातावरणात  एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करत... ढोलताशांच्या गजरात देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील श्री.कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला.

      या उत्सवाला वरुणराजाने दडी मारल्यामुळे ग्रामस्थांनी चिखल तयार करण्यासाठी कृत्रिमरीत्या पाण्याचा वापर करण्यात आला. या उत्सवाची सुरवात संपूर्ण मंदिराला ढोलताशांच्या गजरात एकमेकांवर चिखलफेक करत ५ प्रदक्षिणा घालून करण्यात येते. त्यानंतर मंदिराच्या समोर एका ठिकाणी खोलवर श्रीफळ पुरण्यात येते. हे श्रीफळ काढण्यासाठी सभोवार सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन प्रयत्न करतात. त्याला सापड खेळणे असे म्हणतात.

यावेळी लहान मुलांचा सहभाग बघण्यासारखा होता. यावेळी लहान मुलांनी गोल रिंगण करून तो पुरलेला नारळ काढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत होता. सोबत ढोलताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. हा उत्सव बघण्यासाठी सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.