
मालवण : मालवण पालिकेच्या व्यायाम शाळेतील त्या साहित्यातील त्रुटी दूर करून ते पुन्हा व्यायामशाळेत बसविण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत यांनी दिली.
शहरातील व्यायामपटूंच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. या साहित्याचे लोकार्पण करताना या साहित्यामध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार नाईक यांनी संबंधित ठेकेदाराला सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्व साहित्य त्रुटी दूर करण्यासाठी नेण्यात आले. या त्रुटी लवकरात लवकर दुर व्हाव्यात यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि मंदार केणी यांनी विशेष पाठपुरावा केला. व्यायामशाळेतील साहित्य अचानक हलविण्यात आल्याने विरोधकांनीही याबाबत प्रशासनास जाब विचारला होता. यावर सत्ताधाऱ्यांनी हे साहित्य त्रुटी दूर करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. आज अखेर त्रुटी दूर करत हे सर्व साहित्य व्यायामशाळेत बसविण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहितीही श्री. केणी यांनी दिली.