
वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा क्षेत्रपालेश्वर मंदिराच्या गाभऱ्याला कुलूप लावून फंडपेटीला वेल्डिंग केल्याबद्दल येथील मंदिराचे पुजारी रामा कृष्णा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथीलच गोपाळ मधुकर दळवी व केशव अनाजी दळवी यांच्या विरोधात वेंगुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कृत्यामुळे होडावडा येथील देवस्थानच्या वादात पुन्हा ठिणगी पडली आहे. याबाबत श्री क्षेत्रपालेश्वर देवस्थानचे पूजारी रामा कृष्णा नाईक यांनी वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आमच्या होडावडा देऊळवाडीतील श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिराचे कुळकर नाईक व स्थळकर नाईक हे मानकरी पुजारी आहेत. त्यांना ठरवुन दिल्याप्रमाणे पंधरा पंधरा दिवासांनी ते श्री देव क्षेत्रपालेश्वर मदिरात देवाची पुजाअर्चा करतात, मी कुळकर नाईक असल्याने दिनांक ३० मार्च ते ०८ एप्रिल पर्यंत देवाची पुजा अर्चा करण्याचा मान माझा असल्याने मी दररोज सकाळी ०६.३० वा. चे मानाने मंदिरात पुजा करण्यासाठी जातो. आमच्या श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात गाभा-याच्या दरवाज्याला आम्ही कधीही कुलुप करत नाही. कारण माझी पुजा करून झाल्यानंतर लोक दर्शनाकरीता येवुन- जाऊन असतात, त्यांनतर दिवसभरात माझे ही मंदिरात येणे जाणे सुरू असते.
दरम्यान, आज दिनांक ०६ एप्रिल रोजी सकाळी ०६:३० वाजताचे दरम्याने मी नेहमी प्रमाणे आमच्या श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात पुजा करणेसाठी जाऊन पूजा अर्चा करून मी मंदिरात बसलेलो होतो. सकाळी ८ वाजताच्या दरम्याने गावात राहणारे गोपाळ मधुकर दळवी व केशव अनाजी दळवी हे मंदिरात आले. त्यावेळी केशव अनाजी दळवी यांच्या हातात वेल्डिग मशिन होती. ते देवाच्या दर्शनाकरीता आलेले असल्याने मी त्यांना अधिक काहीही न विचारता चहा पिण्यासाठी माझ्या घरी निघुन गेलो. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या दरम्याने मी पुन्हा मंदिरात आलो असता मला मंदिरातील गाभा-याचा दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावलेले दिसले. तसेच मी मंदिरात बाजुला पाहीले असता श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरातील दोन्ही फंडपेटयांच्या दरवाजाला वेल्डिग केलेले दिसुन आले. याबाबत आपण इतर मानकऱ्यांना याबाबत सांगितल्याने ते सर्वजण मंदिरात आले.
यामुळे श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात गोपाळ मधुकर दळवी व केशव अनाजी दळवी हे दोघे देवाच्या दर्शनाकरीता आले व त्यांनी कोणालाही काहीही न विचारता देवाच्या गाभा-याचा दरवाजा बंद करून त्याला कुलूप करून लोकांना देव दर्शन करणेसाठी प्रतिबंध केला. तसेच मंदिरातील दोन्ही फंडपेटयांना कुलूप लावलेले असताना सुध्दा फंडपेटयांच्या दरवाजाला वेल्डिग केले म्हणून माझी त्यांचे विरूध्द कायदेशिर तक्रार आहे. असे या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर सर्व मानकऱ्यांनी वेंगुर्ला पोलिसात धाव घेऊन कुलूप घातलेल्याना अटक करण्याची मागणी केली. यावरून वेंगुर्ला पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान करत आहेत.