हत्ती परतले पुन्हा तिलारित | पाळयेत केले सुपारी बागायतीचे नुकसान

Edited by: संदीप देसाई
Published on: June 19, 2023 20:25 PM
views 96  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातून तळकट पंचक्रोशीत गेलेल्या हत्तींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्यात वळविला आहे. रविवारी रात्री या वन्य हत्तींनी पाळये गावात तेथील शेतकऱ्यांचे केळी व सुपारी बागायतींचे धुडगूस घालत मोठे नुकसान केलंय. 

  गेल्या आठवड्यात वन्य हत्तींनी केर - भेकूर्ली येथून आपला मोर्चा तळकट पंचक्रोशीतील गावांकडे वळविला होता. या हत्तींनी झोळंबे पर्यंत धडक देत बरेच नुकसान केले होते. त्यातील काही हत्तींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्यात वळविला आहे. काल रविवारी रात्री या हत्तींचा कळप पाळये मध्ये फिरताना आढळला. गावात हत्ती आल्याची बातमी सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना दिली. ग्रामस्थांनी आपल्या परीने या कळपाला हुसकावून लावण्यास सुरूवात केली. मात्र त्याचा म्हणावा तसा काहीही उपयोग झाला नाही. उलट हा कळप मोर्ले बागवाडीमधील शेतकरी विनायक मणेरीकर यांच्या पाळये येथील केळी व सुपारी बागायत मध्ये दाखल झाला. तेथे या  हत्तींनी रविवारी रात्री धुडगूस घालत श्री. मणेरीकर यांचे 90 केळी, 100 सुपारी झाडांचं नुकसान केले आहे. हत्ती पुन्हा माघारी परतल्याने तिलारीत शेतकरी धास्तावले आहेत.