जिल्हा आरोग्य विभागही 'सलाईनवर'..!

▪️ मंत्री केसरकर वेधणार आरोग्यमंत्र्यांचं लक्ष ; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका ▪️ वारंवार वरिष्ठांकडे पाठपुरावा : शल्यचिकित्सक डॉ. पाटील
Edited by: विनायक गावस | प्रसाद पाताडे
Published on: November 23, 2023 20:54 PM
views 73  views

सिंधुदुर्ग : (प्रसाद पाताडे / विनायक गांवस) : जिल्ह्याच्या आरोग्यच्या झालेल्या दैनेबद्दल कोकणसादनं आवाज उठवल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सरकारी रूग्णालयांची दैना यातून मांडण्यात आली आहे. तशीच काहीशी अवस्था जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाचीही आहे. मंजूर ६२८ पदांपैकी ४०० पद भरलेली असून २२८ पद ही रिक्त आहेत. रूग्णांसोबत जिल्ह्यात घडत असलेले प्रकार, आंदोलन, न मिळणारी रूग्णसेवा यामुळे आरोग्य यंत्रणेविरूद्ध सिंधुदुर्गात संतापाची लाट उसळली आहे‌. आरोग्यासाठीच्या या  लोकभावनेनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच लक्ष वेधणार असल्याची माहिती कोकणसादला दिली आहे‌. तर जिल्हा दौऱ्यावर असलेले माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

कोकणसादनं जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच पोस्टमार्टम केलं होतं. आरोग्य यंत्रणेची वस्तुस्थिती समोर आणली होती. याची दखल शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी घेत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच लक्ष वेधणार असल्याच सांगितलं. तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची परिस्थिती पालटण्यासाठी बैठक घेणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. तर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरून सरकारला लक्ष केलं आहे. सिंधुदुर्गच नव्हे तर इतरही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मागील एक-दोन महिन्यात मेडिकल कॉलेज व सरकारी रूग्णालयातून ही परिस्थिती समोर येताना आपण सर्वांनी पाहिली आहे. नांदेड, संभाजीनगर, ठाणे, मुंबईतही आरोग्य यंत्रणेची झालेली दुरावस्था दिसून आली आहे. सरकारने मात्र हातवर केले आहेत. त्यामुळे लोकांकडून डॉक्टरांवर रोष धरला गेला आहे. डॉक्टर, नर्स यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर सरकारकडून त्यांना पाठिंबा मिळत नाही आहे‌. हाफकीनकडून औषध वेळेत पोहचत नाहीत. महापालिका, नगरपालिकांचा सहकार्य मिळालं नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. २४ तास सेवा करणाऱ्यांना सरकारने पाठबळ दिले नाही म्हणून आरोग्य यंत्रणेची दुरावस्था झाली आहे असं मत ठाकरेंनी व्यक्त केल.

जिल्हा रूग्णालयाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातही  तशीच स्थिती आहे‌. ग्रामीण भागात आरोग्य विभाचा अधिक प्रभाव आहेत. मात्र, या ठिकाणीही बरीच महत्वाची पदे ही रिक्त आहेत. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी ही पद रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी गट 'अ' ची ७६ पैकी ७३ पद भरलेली असून ३ पद रिक्त आहेत. गट 'ब' ची १० पैकी फक्त २ पद भरलेली आहेत. ८ पैकी ४ तालुका आरोग्य अधिकारी पद ही रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या ६२८ पदांपैकी ४०० पद भरली असून २२८ पद ही रिक्त आहेत. एवढंच नाही तर सिंधुदुर्ग भूमीतील गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी व शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. सेवा उपलब्ध नसल्याने प्रस्तुतीसाठी इतरत्र जावं लागतं आहे‌. खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण दुर्गम भागात सुविधा नसल्याने १०८ रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


*वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा !*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी या कारभारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे‌. ते म्हणाले, आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणेसाठी ग्रामीण, उपजिल्हा व महिला रूग्णालय येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. तो लवकरात लवकर पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आरोग्य यंत्रणेत ४० टक्के पद रिक्त आहेत. त्यातील टेक्निकल स्टाफ व विशेषतज्ञ ही पद रिक्त आहेत. त्याचा वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. त्यावर प्रतिसाद मिळत आहे. काही एमपीएससी झालेले व परिक्षा झालेले विद्यार्थी आहेत त्यातून ही रिक्तपदे भरली जाणार असल्याचे वरिष्ठांकडून सांगितले आहे. तर स्त्रीरोग तज्ञ असलेल्या ठिकाणी प्रसुती केली जाते. देवगड ग्रामीण, उपजिल्हा व महिला रूग्णालयात तज्ञ उपलब्ध असून तिथे उपचार मिळत आहेत. प्रसुती देखील होत आहे. क्वचित प्रसंगी ज्या गरोदर माता आहेत त्यांना जिल्हातून बाहेर रेफर केल जात त्याची टक्केवारी कमी आहे असं डॉ. पाटील म्हणाले.

१०८ रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती !

जिल्ह्यातील ग्रामीण भागात नसलेल्या सुविधा व प्रसुती तज्ञांची असलेली कमतरता यामुळे मागील वर्ष भरात जिल्ह्यात दहा ते बारा महिलांची प्रसूती ही १०८ मध्ये झाली आहे. सुरक्षित रित्या ही प्रसुती १०८ च्या कर्मचारी वर्गाकडून करण्यात आली आहे. तर २०१४ पासून तब्बल २४० प्रसुती या १०८ ॲम्ब्युलन्समध्ये करण्यात आल्या आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना प्रसुतीसह सीझरवेळी अधिक उपचारासाठी परराज्यात जावं लागतं. जिल्ह्यात हवी तशी चांगली सेवा शासकीय रूग्णालयात मिळत नाही. खासगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागतात. तेथील आर्थिक भुर्दंड हा सामन्यांना परवडणारा नाही. त्यामुळे महिलांसाठी विशेष लक्ष सरकारनं द्याव अशी आमची मागणी आहे. तर शासकीय रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून महिल डॉक्टरची नियुक्ती करणं आवश्यक आहे. पुरुषांना विरोध नाही पण, महिला प्रसुतीतज्ञ  असल्यास स्त्रीयांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा मिळेल.

अर्चना घारे-परब, कोकण विभाग महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी


वैभववाडीच्या ग्रामीण रूग्णालयाची परिस्थिती भयानक आहे. उपचारा अभावी रूग्ण देखिल दगावले आहेत. महिला सुरक्षा, प्रसुती, कुटुंब कल्याण, जननी सुरक्षा योजना अशी गोंडस नाव दिली आहेत. मात्र, कुणालाही याचा लाभ होत नाही. गोरगरिबांसह महिला रूग्णांना भूलतज्ज्ञ नसल्याने कणकवलीला पाठवले जाते. यात स्त्रियांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. मुल नको अस म्हणायची दुर्दैवी वेळ येते. बेटी बचाव बेटी पडाव हे फक्त जाहिराती पुरतच मर्यादित राहिल आहे. या यंत्रणेवर कुणाचा अंकुश राहीलेला नाही. 

मीना बोडके, महिला जिल्हा कॉग्रेस उपाध्यक्ष

खरोखरच आज आपली आरोग्य व्यवस्था रुग्ण शय्येवर आहे. रिक्त पद आणि औषधांचा तुटवडा यामुळे आता सरकारी रुग्णालयांवर विस्श्वास ठेवाण कठीण झालंय. त्यामुळे आरोग्य व्यवस्था महाग झाली आहे. यासगळ्याकडे नेतेमंडळींचं दुर्लक्ष होत आहे. आपल्याला कुठल टेंडर मिळतंय याकडे पुढाऱ्यांचा भर असतो. राजकारण अत्यंत घाणेरड झालंय. त्यामुळे यावर आवाज उठवण कमी होऊन बसलं आहे‌. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयातील औषधांच्या तुडवडा मुद्दाम केला जातोय.

कमलताई परूळेकर, सामाजिक कार्यकर्ता

वैभववाडीतील आरोग्याची अवस्था दयनीय आहे. शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल आहे. पद रिक्त असल्याने सेवा मिळत नाही. औषधांचा तुटवडा आहेत. यंत्रसामग्री पडून आहेत. रूग्णांना इतरत्र पाठवले जात. खासगी उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहेत. कंत्राटी स्वरूपातील डॉक्टरांना पगार न मिळाल्याने ते देखील टिकत नाही आहेत. प्रसुतीसाठी गेलेल्या स्त्रीयांना वैभववाडीत उपचार मिळत नसल्याने बाहेर जाव लागत. वैभववाडीत त्यापद्धतीचे खासगी दवाखाने देखील नसल्यान एकदिवस जनतेचा उद्रेक होणार आहे. 

अक्षता जैतापकर, नगरसेविका वैभववाडी

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा धासाळलेली आहे. गरोदर मातांना उप  जिल्हा, जिल्हा रूग्णालयात पुरेपूर उपचार मिळत नाही. महिलांना चांगले उपचार मिळण आवश्यक आहे. सत्ताधारी लोकांनी मनात घेतल तर ते सहज शक्य आहे. गोवा, बेळगाव येथे उपचारासाठी करावी लागणारी वारी आता थांबण आवश्यक आहे. ही परिस्थिती देखील बदलू शकते. फक्त इच्छा शक्ती असायला हवी. सर्वांना एकजुटीने हा प्रश्न मार्गी लावावा. आमच्या सारख्या सामाजिक संघटना आरोग्य क्षेत्रात मदतीसाठी सदैव कार्यरत राहिल. 

शिल्पा खोत, सामाजिक कार्यकर्त्या

शासकीय रूग्णालयात गरोदर महिला त्यांचे नातेवाईक आशेने येत असतात. पण त्या पद्धतीने उपचार त्यांना मिळत नाही. सोयी सुविधा उपलब्ध नाही अस सांगून इतरत्र पाठवले जाते. आपल्या तालुक्यात जन्म घ्यायचाच नाही का? असाही प्रश्न पडतो. कणकवलीत सोनोग्राफी मशीन आहे पण तंत्रज्ञ नाही. त्यामुळे गर्भवतींना इतरत्र जाव लागते. वैभववाडी, देवगड आणि कणकवलीसाठी उपजिल्हा रूग्णालय कणकवली महत्त्वाच ठरत. त्यामुळे इथे सुविधा मिळण आवश्यक आहे. खासगी उपचार घेणे सर्वांना परवडणार नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर आंदोलन छेडाव लागेल.

वैदेही गुडेकर, महिला तालुका प्रमुख ठाकरे गट

महिला गरोदर असताना महिलांची परवड होते. देवगड ग्रामीण रुग्णालयात पुरेपूर सुविधा नाही आहेत. गर्भवती महिलांना प्रसुती दरम्यान लांब पल्ल्याचा प्रवास करण देखील अवघड असत. वेदना या असह्य होत असतात. त्यामुळे आरोग्यदृष्टीने जिल्हा परिपुर्ण व्हावा गोरगरिबांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. प्रसुती दरम्यान महिलांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. 

पुजा दुखंडे, सामाजिक कार्यकर्त्या