
वैभववाडी : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांच्याविरोधात ठाकरे शिवसेनेचे शिवाजी राणे यांनी केलेला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित राहिले आहे.
सन २०२१-२२ मध्ये वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीत संजय सावंत व शिवाजी राणे यांच्यात प्रभाग क्र. १३ मधून लढत झाली होती. यात संजय सावंत हे विजयी झाले होते. त्यानंतर श्री.सावंत यांच्याविषयी माहिती मिळवून श्री. राणे यांनी वाभवे येथील घर नं. ३४ च्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम श्री. सावंत यांनी नगरसेवक कारकिर्दीत अनधिकृतपणे केले. तसेच निवडणूकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात शासनाकडे अनधिकृत बांधकामाबाबत भरलेल्या दंडाचा व अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केलेला नव्हता अशी कारणे देत त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे व अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करावी असा अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे केला होता. मात्र श्री.राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला अपात्रता अर्ज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी फेटाळला आहे. त्यांनी नगरसेवक कारर्किदीत बांधकाम केल्याचा पुरावा आढळुन न आल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आला. श्री.सावंत यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिल्यानंतर श्री सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे.पराभव पचविता न आल्यामुळेच शिवाजी राणे यांनी अशा प्रकारचा अर्ज माझ्याविरोधात दिला होता. परंतु त्यांचा अर्जच फेटाळुन लावण्यात आला आहे. त्यामुळे सत्याचा विजय झाला आहे.या निर्णयामुळे आपण अधिक ताकदीने आपण शहरातील जनतेची सेवा करू असं सावंत यांनी सांगितले. तसेच ठाकरे सेनेवर सडकून टीका केली. मला राजकीयदृष्ट्या मलीन करून मानसिक व आर्थिक त्रास देण्यासाठी उबाठा सेनेचे पावसाळी बेडूक या सर्वांचे म्होरक्या आहेत. त्या व्यक्तीच्या माध्यमातून श्री.राणेंसारख्या व्यक्तीला रसद पुरविली जाते. सातत्याने माझ्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या देऊन माझी मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता.परंतू मी प्रामाणिक व सत्याचा पाईक असल्याने या प्रकारांना घाबरलो नाही. या सर्वाला न डगमगता सामोरे गेलो, त्यामुळेच मला या न्याय मिळाला अस सावंत यांनी म्हटलं आहे.