दापोली : दापोली शहरातील मच्छीमार्केट जवळ असलेल्या रिक्षा थांब्यावर दोन रिक्षा चालकांमध्ये झालेल्या वादाचे पर्वयासन जातीवाचक शिवीगाळ करण्यापर्यंत गेल्याचा प्रकार काल दुपारी २.४५ च्या सुमारास घडला असून याप्रकरणी ३ संशयिताविरोधात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील मच्छीमार्केट जवळ असलेल्या रिक्षा थांब्यावर शैलेश गौतम मोहिते हे रिक्षा व्यवसाय करतात. काल (ता.२०) रोजी दुपारी २.४५ चे सुमारास मोहिते हे ग्राहकांची वाट पहात रिक्षा थांब्यावर उभे असताना दुसरे रिक्षा व्यावसायिक सुयोग संजय रेवाळे यांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा मोहिते यांच्या उजव्या पायाच्या करंगळीवरून नेली. त्याचा जाब मोहिते यांनी रेवाळे यांना विचारला असता संशयित सुयोग संजय रेवाळे, संकेत संजय रेवाळे व संजय रेवाळे सर्व रा. खेर्डी, पांढरिची वाडी यांनी शैलेश मोहिते यांना मारहाण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार शैलेश मोहिते यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी या ३ संशयीताविरोधात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चिपळूणचे पोलीस उपअधीक्षक राजमाने करत आहेत.