दारू पिण्याची अनिवार इच्छा हाच आजार : डाॅ. रुपेश पाटकर

अल्कोहोलिक्स ॲनोनिमसचा सावंतवाडीत समूह स्थापन
Edited by:
Published on: January 05, 2025 18:48 PM
views 276  views

सावंतवाडी : दारु प्यायल्यामुळे विविध शारीरिक आजार जडत असले तरी मुळात दारु पिण्याची अनिवार इच्छा होणे हाच एक आजार असल्याचे प्रतिपादन मनोविकारतज्ज्ञ डाॅ.रुपेश पाटकर यांनी केले. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित एएच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळेस व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे ॲड. संदीप निंबाळकर, निरामय विकास केंद्राच्या वंदना करंबेळकर आणि अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमस संस्थेचे सभासद उपस्थित होते.

यावेळेस बोलताना डाॅ.पाटकर पुढे म्हणाले की मद्यपाशाचा आजार हा कायमस्वरुपी आजार असून अल्कोहोलिक्स ॲनाॅनिमसच्या बैठाकांना नियमित हजर राहणे हा यावरचा महत्त्वाचा उपाय आहे. अमेरिकेतील ॲक्राॅन या शहरी १९३५ साली सुरू झालेल्या या संस्थेने लाखो पेशंटना मद्यमुक्त राहण्यास मदत केली आहे. या संस्थेच्या बैठका विनामूल्य असून मद्यमुक्त राहण्याची इच्छा ही या बैठकांसाठी एकमेव अट असते. 

डाॅ.पाटकर पुढे म्हणाले की हा दीर्घकालीन आजार असल्याने या आजाराचा पुनरउद्भव केव्हाही होऊ शकतो. असे झाल्यास न लाजता उपचार घेण्यास येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळेस बोलताना ॲड.निंबाळकर यांनी श्रीराम वाचन मंदिराच्या सर्व सभासदांच्या वतीने वाचन मंदिराच्या इमारतीत असे लोकोपयोगी काम करण्यास सक्रीय पाठींबा असल्याचे व्यक्त केले. यावेळेस वंदना करंबेळकर यांनी सावंतवाडीत नव्याने सुरु होणाऱ्या एए गटास शुभेच्छा दिल्या.  यावेळेस वेंगुर्ले, मालवण, कणकवली, जळगाव, मुंबई येथील अनेक एए सभासद उपस्थित होते.