दिव्यांग प्रकाश सोगम यांची जिद्द

जलतरण स्पर्धेत १५० पदके
Edited by:
Published on: April 10, 2025 15:07 PM
views 177  views

सिंधुदुर्ग : सुख नदीत लहानपणी मारलेली डुबकी राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र हे खरे ठरले आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कुसुर या छोट्याशा गावात जन्मलेल्या दिव्यांग जलतरणपटू प्रकाश सोगम यांच्या बाबतीत. जिद्दीचे पंख लाभलेल्या सोगम यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत १५० पदके प्राप्त केली आहेत.

तरुणालाही लाजवेल अशा वयाच्या ५७ व्या वर्षीही प्रकाश यांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. महात्मा गांधी जलतरण तलाव येथे लायन्स क्लबने नुकत्याच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेत प्रकाश यांनी  बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण आणि ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. 

कुसुर या गावीच प्रकाश सोगम यांचा जन्म झाला. दोन वर्षांचा असताना  आलेला ताप प्रकाश यांना दिव्यांग करून जाईल याची पुसटशी कल्पनाही नसलेल्या आईवडिलांनी शेतात काबाडकष्ट करून त्याला बरे करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. नियतीने दगा दिला आणि दिव्यांगत्व कायमस्वरूपी नशिबी आले. 

गावातील सर्व सवंगडी सुख नदीच्या डोहात सूर मारायचे. ते पाहून प्रकाशने मनाशी निश्चय केला. एके दिवशी ठरवलं आणि पाण्यात उडी मारली. त्या मारलेल्या उडीनेच त्याला राष्ट्रीय स्तरापर्यंत नेले अन् इतरांपेक्षा वेगळा असल्याचे सोगम यांनी दाखवून दिले. 

राजाराम घाग यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले.

शालेय शिक्षण झाल्यानंतर प्रकाश रोजगाराच्या शोधात मुंबईला आला. छोटीमोठी कामं करत असतानाच इंग्लिश चॅनल पार करणारे आशिया खंडातील दुसरे जलतरणपटू राजाराम घाग यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत प्रकाशने एकूण १५० पदके मिळवली आहेत. 

गंगा नदीत १५ कि.मी. तसेच राष्ट्रीय स्तरावरील ७ कि.मी., ९ कि.मी., ११ कि.मी. अशा स्पर्धा प्रकाशने लीलया जिंकल्या. जिद्दीचे पंख लाभलेल्या प्रकाश यांना २००१ साली भूतान आणि त्याअगोदर इंग्लंडला जायची संधी मिळाली, परंतु पैशांअभावी त्यांना परदेशात जाता आले नाही याची सल आजही प्रकाश यांना बोचते आहे.

महाराष्ट्र शासनाचा २००३-२००४ सालचा जिल्हा क्रीडा पुरस्कारही प्रकाशला मिळाला आहे, परंतु शिवछत्रपती पुरस्काराची खंत प्रकाश यांच्या मनात कायम आहे.