
बांदा : मडूरा - भरडवाडी येथील साईमंदिर नजीक यशवंत लाडू गवस (रा. पिकुळे, ता. दोडामार्ग) यांचा मृतदेह आढळून आला. ते कालपासून बेपत्ता होते. ते २९ मे रोजी पत्नी व मुलीसह निगुडे येथे पाहुण्यांकडे आले होते. रविवार २ जून रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान ते मडूरा तिठा येथे पेपर नेण्यासाठी आले होते. मात्र, ते वाट चुकले व भरडवाडी परिसरात आले.
आज सकाळी स्थानिकांना ते झुडपा नजीक पडलेले दिसून आले. दारू पिऊन कोणीतरी पडला असावा असा समज झाल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. दुपारी पोलीस पाटील नितीन नाईक यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. नातेवाईकांकडून खातरजमा केल्यानंतर सदर मृतदेह पिकुळे येथील यशवंत गवस यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस पाटील नितीन नाईक यांनी बांदा पोलिसात याबाबतची माहिती दिली. सदर मयत यशवंत गवस हे विक्रोळी (मुंबई) येथे रिक्षा व्यवसाय करायचे. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे घटनास्थळी दाखल झाले आहेत.