मकर संक्रांती भोगी सणाचा दिवस 'पौष्टिक तृणधान्य दिन' म्हणून साजरा करावा

कृषि आयुक्तालयाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण अधिकारी विकास पाटील यांचं आवाहन
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 12, 2023 18:43 PM
views 196  views

सिंधुदुर्गनगरी : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत 'मकर संक्रांती भोगी' हा सणाचा दिवस राज्यामध्ये 'पौष्टिक तृणधान्य दिन' म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण अधिकारी  विकास पाटील यांनी केले आहे. 

मकर संक्रांतीचा औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यकांनी आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. 

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आपण सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत "मकर संक्रांती भोगी" हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये "पौष्टिक तृणधान्य दिन" म्हणून साजरा करण्याबाबत शासनाने सूचित  केले आहे.