
सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत त्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. रूग्णालयातील परिस्थितीचा देखील त्यांनी आढावा घेतला. सावंतवाडीत उपचार घेणाऱ्या ४८ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ४८ तर कुडाळ, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली. यावेळी उपस्थित पालकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. चौगुले आदी उपस्थित होते.
दरम्यान, काल रात्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनाय राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.