
वैभववाडी : राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. फळपिक विम्याचे ७० कोटी रूपये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे व आम नितेश राणे यांच्यामुळे मिळाले. शेतक-यांची दिवाळी गोड झाली आहे, अस जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी सांगत या निर्णयाच स्वागत केल. जिल्हयातील ३४ हजार आंबा, काजु बागायतदारांना फळपिक विम्याचा परतावा दिवाळीच्या मुहुर्तावर मिळणार आहे. ही रक्कम येत्या दोन तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खाती जमा होणार आहे. यासंदर्भात भाजपाचे जिल्हा प्रवक्ते श्री.साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्री.साठे म्हणाले, केंद्र शासन आणि राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम राहीले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय दोनही सरकारने घेतलेले आहेत. कोकणातील आंबा, काजु बागायतदारांचे नैसर्गीक आपत्तीत होणारे नुकसान टाळण्यासाठी शासन गेल्या काही वर्षापासुन हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबवित आहे. या योजनेचा मोठा दिलासा कोकणातील आंबा,काजू बागायतदारांना मिळाला आहे. यावर्षी देखील जिल्हयातील ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रूपये मिळणार आहेत.ही रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम मिळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे हे शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना विमा रक्कमेच्या रूपाने बोनस मिळाला असुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडुन शासनाने आभार मानले जात आहे. पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यातील सरकार आणि जिल्हयातील भाजपाचे सर्व नेते हे शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहेत. हे स्पष्ट झाले असुन काही जण मिळणाऱ्या ७० कोटी आपल्यामुळेच मिळाले असा आभास निर्माण करीत आहेत. परंतु ही रक्कम कुणामुळे मिळाली हे शेतकऱ्यांना ठाऊक असल्याचे श्री.साठे यांनी स्पष्ट केले.