
कुडाळ : कुडाळ बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेलं घड्याळ केवळ शोभेची वस्तू बनलं आहे. गेले अनेक दिवस हे घड्याळ बंद अवस्थेत असून, त्याचा मिनिटकाटा आणि तासकाटा एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, वेळेबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
बस स्थानकातून ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांचे लक्ष या घड्याळाकडे जाते. मात्र, ते नेहमी बंद अवस्थेत पाहून त्यांची निराशा होते. स्थानकात लावलेल्या या सार्वजनिक घड्याळाची दुरुस्ती कधी होणार, याबाबत अनिश्चितता आहे. याकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.
प्रवाशांनी या घड्याळाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना वेळेची योग्य माहिती मिळू शकेल आणि बस प्रवासाचं नियोजन करणं सोपं होईल.