
कुडाळ : माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतचे भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकाराने कुडाळ नगरपंचायत मधील 17 सफाई कर्मचाऱ्यांसाठी अक्कलकोट व शिर्डी या दोन तीर्थक्षेत्र भेटीच्या टूरचे नियोजन करण्यात आले आहे. हे सफाई कर्मचारी शनिवार दि. 25 मार्च रोजी कुडाळ येथुन मार्गस्थ होऊन सोमवार दि. 27 मार्च रोजी परत माघारी येणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या या टूरच्या नियोजनामुळे सफाई कर्मचाऱ्यांमधून व त्यांच्या कुटुंबियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कुडाळ नगरपंचायतचे सफाई कर्मचारी हे तुटपुंज्या मानधनावर नगरपंचायतमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. इतरांप्रमाणे त्यांनाही तीर्थक्षेत्र भेटीला जाण्याची इच्छा होती. याची दखल घेत भाजप नगरसेवक अभिषेक गावडे यांनी पुढाकार घेत माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ नगर पंचायत मधील 17 कर्मचाऱ्यांना अक्कलकोट व शिर्डी तीर्थक्षेत्र जाण्यासाठीचे नियोजन केले आहे.