शहरातील विविध समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांचं वेधलं लक्ष...!

Edited by: विनायक गावस
Published on: November 25, 2023 10:20 AM
views 84  views

सावंतवाडी : शहरातील जुनी घरे यामध्ये जे जुने भाडेकरू आहेत त्यांना पालिका प्रशासनाने भरमसाठ कर लावला आहे. तसेच रस्त्याच्या साईड पट्टीला जे छोटे मोठे व्यापारी बसत आहेत त्यांना जागा द्या, मोती तलावाच्या फुटपाथवर तसेच मोती तलावात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. सावंतवाडी बाजारपेठेत पालिका प्रशासनाचे काही कर्मचारी व्यापाऱ्यांकडून गुपचूप रित्या भाडे घेत आहेत असा अंधाधुंदी कारभार सध्या सावंतवाडी शहरात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे.

या कारभाराकडे मुख्याधिकारी सागर साळुंखे तुम्ही लक्ष द्या अशा विविध मागण्या, समस्या घेऊन आज सावंतवाडी शहरातील सुज्ञ जागरूक नागरिक माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, तानाजी वाडकर, अभय पंडित, सत्यजित धारणकर, महेश नार्वेकर, सिताराम गावडे, नंदू मोरजकर, इम्तहाज राजगुरू यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेतली.

तक्रारींचा पाढा त्यांनी वाचला. यावेळी सीओ साळुंखे यांनी निश्चितपणे आपल्या सर्व समस्या व अडचणींचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले. सावंतवाडी शहर स्वच्छ सुंदर आहे. हे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आम्ही सर्व जनतेने त्यासाठी अविरत मेहनत घेतली आहे आणि हे शहर स्वच्छ सुंदर ठेवले होते. मग आता पालिकेवर प्रशासन आल्यापासून या शहरात अनेक समस्या अडचणी उद्भवत आहेत. कुणाचा कुणावरच लक्ष नाही का असा सवाल यावेळी भोगटे यांनी केला.

सावंतवाडी शहरात जुनी घरे आहेत त्या घरामध्ये जुने पूर्वीचे भाडेकरू राहतात त्या भाडे करून भरमसाठ कर लावण्यात आला आहे. हा कर अन्यायकारक असून तो कर कमी करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात निश्चितपणे आपण लक्ष घालेन असे श्री साळुंखे यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळातील उपस्थित सर्वांनीच मुख्याधिकारी साळुंखे यांच्याकडे लक्ष वेधले. सावंतवाडी बाजारपेठेत सध्या भाजी व अन्य व्यापारी बसतात त्यांच्याकडून पालिका प्रशासनामार्फत जागेची भाडे आकारण्यात येते मात्र काही कर्मचारी काही व्यापाऱ्यांकडून गुपचूप रित्या या पिशवीत पैसे टाका असे सांगून त्यांच्याकडून लूट करून घेत आहेत.

हे कुठेतरी थांबायला हवे तसेच रस्त्याच्या साईड पट्टीने जे व्यापारी बसत आहेत त्यांना योग्य जागा द्या, शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली. यावेळी उमाकांत वारंग, तानाजी वाडकर, विलास जाधव यांनी मोती तलावाच्या परिसरात अस्वच्छता आहे. मोती तलावात बाटल्याआधी वस्तु टाकल्या जात आहेत. स्वच्छता केली जात नाही असे निदर्शनास आणून दिले.