
कुडाळ : केंद्र सरकारकडून आज देशभरातील लाखो मोबाईल फोनवर आपत्कालीन अलर्टची चाचणी घेतली जाणार आहे. यादरम्यान तुमच्या मोबाईलवर मोठा सायरन वाजू शकतो. मात्र, हा केवळ एक सराव असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी (उदा. पूर, चक्रीवादळ, भूकंप) नागरिकांना तातडीने पूर्वसूचना देण्यासाठी सरकारने 'सचेत' (SACHET) नावाची नवीन आपत्कालीन अलर्ट प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी प्रभावीपणे काम करते की नाही, हे तपासण्यासाठी दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही चाचणी घेतली जात आहे.
तुमच्या मोबाईलवर एक चाचणी (Test alert) मेसेज येईल.
मोबाईल सायलेंटवर असला तरीही मोठा सायरन वाजेल.
सर्वात महत्त्वाचे : यासाठी नागरिकांना कोणतीही कृती (Action) करण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही.
ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या (ITU) शिफारशींनुसार 'कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल' (CAP) वर आधारित असून, ती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय आहे. सेकंदात हजारो नागरिकांना आपत्कालीन सूचना पाठवणे शक्य होणार आहे. पूर्वसूचनेमुळे जीवित आणि वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे. केवळ आपत्तीचा फटका बसणाऱ्या विशिष्ट भागातील नागरिकांनाच अचूक अलर्ट पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.










