
कुडाळ: कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर पत्र २८ एप्रिल २०२६ रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना हे पत्र देण्यात आले होते. आगामी पावसाळा लक्षात घेता कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची प्रमुख मागणी यात करण्यात आली होती. कुडाळ शहरातून कुडाळ रेल्वे स्टेशन रस्ता (कुडाळ-बाव), कुडाळ-मालवण मुख्य रस्ता, कुडाळ पोलिस स्टेशन ते आर.एस.एन. हॉटेल रस्ता, तसेच कुडाळ-सरंबळ आणि कुडाळ-वेंगुर्ला हे अत्यंत महत्त्वाचे रस्ते जातात. या प्रमुख मार्गांवरून स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ आणि वाहतूक असते. आगामी मान्सून आणि त्यापुढील उत्सवांचा काळ विचारात घेऊन या सर्व रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. केवळ रस्तेच नव्हे, तर पावसाळ्यात पाणी साचून उद्भवणारी समस्या टाळण्याची दक्षता घेण्यास सुचवले होते. यासाठी रस्त्यालगतचे गटार आणि नाले यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. या पत्राची प्रत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या पत्राची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यामुळे आगामी पावसाळ्यात कुडाळकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत.










