
दोडामार्ग : आधुनिक जगात आपला भारत देश प्रगतशील देशाबरोबर स्वावलंबी बनला पाहिजे, यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात अनेकजणांनी हे योगदान दिल आहे. अशाच विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा परिसंवाद दिल्ली येथे आयोजित करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत परिसंवादासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापक मोहनराव देसाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
जग वेगाने आधुनिकतेच्या दिशेने जात असून देश आता जगाच्या बरोबरीने जात आहे. देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून त्यासाठी देशवासियांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या एकूण कामगिरीची दखल घेऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात देशातील विशेष ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी जे महत्त्वाचे योगदान दिले आहे त्याचा लाभ भारतातील सर्वांना होणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा अभ्यास करून नवीन पिढीने मार्गक्रमण करावे व देशाचे नाव जगात उज्वल करावे. यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून देशातील निवडक विशेष जेष्ठ नागरिकांना या परिसंवादासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कळणे सारख्या दुर्गम गावात जन्मलेल्या प्राध्यापक मोहनराव देसाई यांनी आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. सामाजिक, आर्थिक, राजकीय व उद्योग क्षेत्रात वावरणाऱ्या प्राध्यापक मोहनराव देसाई यांनी शिक्षण व सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अनेक शिक्षण संस्था व सहकारी संस्थांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. शिक्षकी पेशात असूनही त्यांचा अन्य क्षेत्रातही अभ्यास दांडगा असून स्वतःच्या पगारातून विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना मानधन देऊन त्यांनी प्रसंगी शाळा चालवलेल्या आहेत. कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नूतन विद्यालय कळणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी राबवलेल्या उपक्रमाची दखल आत्मनिर्भय भारतच्या केंद्रीय पथकाने घेतली असून देशातील निवडक विशेष व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
20 जाने 2024 रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील स्पीकर हॉलमध्ये हा परिसंवाद होणार असून त्यात श्री. देसाई सहभागी होणार आहेत. यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास अनेक केंद्रीय मंत्री तसेच अनेक राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. या निवडीबद्दल प्राध्यापक देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.