
सावंतवाडी : सहकारातील संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले. केंद्र सरकारने लागू केलेल्या सहकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा संघाच्या सभागृहात प्रमोद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थितांमध्ये उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, शशिकांत गावडे, प्रवीण देसाई, ज्ञानेश परब, गुरुनाथ पेडणेकर, दत्ताराम हरमलकर, आत्माराम गावडे, विनायक राऊळ, अभिमन्यू लोंढे, दत्ताराम कोळमेकर, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रश्मी निर्गुण आणि व्यवस्थापक महेश परब यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना अध्यक्ष गावडे यांनी सांगितले की, शेतकरी आणि सहकार क्षेत्र अनेक अडचणींचा सामना करत आहेत. शेतकऱ्यांकडून खतांची मागणी घटली असून, ई-पीक नोंदणी कमी होत असल्यामुळे हमी भावाने भात खरेदीवर परिणाम होत आहे. तसेच, भात खरेदी आणि गोदाम भाडे वेळेवर मिळत नसल्याने खरेदी-विक्री संघाला स्वतःच्या खर्चातून ते भागवावे लागत आहे. सभेमध्ये ज्येष्ठ सभासद रामचंद्र राऊळ, पांडुरंग नाईक, प्रकाश देसाई, अशोक देसाई, दशरथ देसाई, मंगेश सावंत, शिवाजी नाईक, रमाकांत सावंत, गजानन गावडे,आणि ज्ञानेश्वर ठाकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, दहावी, बारावी आणि शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी हितेश गावडे, अवनीश लोंढे, धैर्य कोळमेकर, काव्या रेडकर आणि गौरंग गावकर यांचाही गुणगौरव करण्यात आला.यावेळी सुनील देसाई, रमेश गावकर, सी. एल. नाईक, गजानन गावडे, मंगेश सावंत, अरुण गावडे, सुरेश गावडे, बापू सावंत यांच्यासह इतर सभासदांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना मांडल्या.










