आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांची तोफ धगधगत राहणार !

कोकणात एकवटला मराठा समाज ; जरागेंना पाठिंबा,भव्य बाईक रॅली !
Edited by:
Published on: November 08, 2023 15:23 PM
views 194  views

सावंतवाडी : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सावंतवाडी सकल मराठा समाजानं पाठिंबा दिला आहे. यासाठी बाईक रॅली काढून मराठा आरक्षणाची हाक मराठा बांधवांनी देत तहसील कार्यालयासमोर सरकार व प्रशासनाला जाग आणण्यासाठी समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. समाजाच्या मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांकडे सादर करण्यात आल. 'एक मराठा, लाख मराठा' आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा ! अशा घोषणा देत शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमुळे मराठ्यांच भगव वादळ शहरातील रस्त्यावर पहायला मिळाल. ग्रामीण भागातून देखील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. 


तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीबाबत सकल मराठा समाज बांधवांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना आपले निवेदन सादर केले. यात समाजाला आरक्षण मिळावे अशी सावंतवाडी तालुक्यातील मराठा बांधवांची मागणी असून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे दिलेल्या सर्व मागण्यांबाबत आमचीही मागणी आहे. या सर्वबाबींचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षणचा न्याय मिळवून द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे बांधव आहेत. त्यामुळे आपणांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा मराठा समाज बांधव-भगिनींनी व्यक्त केली. 'एक मराठा लाख मराठा.!', 'जय भवानी, जय शिवाजी.!', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.!' अशा जोरदार घोषणांनी सावंतवाडी शहर  दुमदुमून गेलं. सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीमुळे भगव वादळ रस्त्यावर पहायला मिळाल. सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे श्री देव पाटेकर यांच्या चरणी नारळ अर्पण करून सकल मराठा समाजाच्या या बाईक रॅलीला सुरुवात झाली. राजवाडा येथे या रॅलीत सहभागी झालेले सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर, बाजारपेठ ते सावंतवाडी तहसीलदार कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने मराठा बांधव यात सहभागी झाले होते. शिस्तबद्धपणे ही रॅली पार पडली. त्याबद्दल सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व हीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहनही केले. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाज आजवर देत आला. आज हक्काच आरक्षण मागत आहे. जातीजातीत कधीही मराठा समाजान तेढ निर्माण केले नाही, करणार नाही. बारा बलुतेदारांना सोबत घेऊन मराठा समाज पुढे गेला आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काच आरक्षण मिळाल पाहिजे, जोपर्यंत ते मिळणार नाही तोवर ही मराठ्यांची तोफ धगधगत राहिल अशी भावना त्यांनी व्यक्त केली‌.


दरम्यान, काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाच सावट असताना देखील सह्याद्रीच्या दर्‍या-खोऱ्यातून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मराठ्यांची आरक्षणाची मागणी जोरदारपणे लावून धरण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने सावंतवाडीत  दाखल झाले होते. मराठा समाजातील महिला भगिनींचा मोठा सहभाग यात होता.यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, महिला नेत्या अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, पुंडलिक दळवी, अशोक दळवी, रुपेश राऊळ, लक्ष्मण नाईक, विनायक दळवी, रेवती राणे, भारती मोरे, पुजा दळवी, प्रमोद सावंत, विलास जाधव,दाजी गांवकर, राजन म्हापसेकर, संदीप राणे, सुधीर राऊळ, गुणाजी गावडे, विनायक सावंत, शिवाजी परब, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे आदींसह हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील बांधव बाईक रॅलीत सहभाग झाले होते.