बारसुत वादळापूर्वीची शांतता | माती सर्वेक्षणाला प्रखर विरोध

राज्य सरकारच्या पथकाला परतावं लागलं माघारी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 24, 2023 19:38 PM
views 134  views

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून कोकणातील ग्रीन रिफायनरी प्रकल्प चर्चेत आहे. कोकणातील रोजगार - विकासाला चालना देणारा हा प्रकल्प कधी होतोय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आता या प्रकल्पाच्या कामाला वेग आलाय. त्याची सुरुवात माती सर्वेक्षणापासून सुरु झाली खरी मात्र अपेक्षेप्रमाणे विरोधक एकवटले आणि काही काळासाठी आता माती सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आलीय. त्यामुळे सध्या  बारसुत वादळापूर्वीची 'शांतता' पाहायला मिळतेय. 


कोकणातील बहुचर्चित ग्रीन रिफायनरी प्रकल्प नाणार ऐवजी आता राजापूर - बारसू इथं प्रस्तावित आहे. या महाकाय प्रकल्पासाठी तब्बल 7 हजार हेक्टर जमीन लागणार आहे. 3 लाख कोटींचा हा प्रकल्प असून त्यामुळे लाखो करोडोंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. होय नाही म्हणता म्हणता आता या प्रकल्पाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर माती सर्वेक्षणाला सोमवारपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव गावात सर्वेक्षणासाठी जवळपास दीड ते दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर बारसू सोलगावसह आजूबाजूच्य परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहेत. गावागावातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्यात. तसंच बारसू आणि सोलगावच्या परिसरात आज पोलिसांचा रुट मार्च देखील होणार आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. 


सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी अनेक स्थानिकांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय. बारसूच्या माळरानावर रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येने जमले होते. रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक जमले आहेत, कारण ते जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत. जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा तो झुगारत विरोधकांनी लढाई सुरु केलीय. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास 70 टक्के हून अधिक महिलांचा सहभाग आहे. यातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास झाला. आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयात जाणार नाही, असं म्हणत संबंधित महिलेने आंदोलनस्थळी कायम राहण्याचा निर्णय घेतला.


दुसरीकडे रिफायनरी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी निघालेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. कशेळी बांध इथे पोलीस व्हॅन उलटली आणि अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


 हे सर्वेक्षण सुरु असतानाच रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहे. कालपासून 15 लोकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. 40 लोकांना हद्दपार करण्यात आलंय तर 25 हून अधिक जणांना नजर कैदेत ठेवण्यात आलय. अस असतानाही कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता सरकारने आजच सर्वेक्षण स्थगित केलाय. सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला माघारी बोलवण्यात आलंय. 


दरम्यान, सुरुवातीपासूनच ग्रीन रिफायनरीला राजकीय नेतेमंडळींचा मोठा विरोध होता. त्यात ठाकरे गट आघाडीवर होता. मात्र, ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला थेट पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे इतर नेतेमंडळी याला कडाडून विरोध करत होते. सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत असताना राजन साळवी मात्र नो कमेंट्सच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 25 एप्रिल कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार आहे. सध्या पोलीस बळाच्या होत असलेल्या वापरावर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी रिफायनरी विरोधात भूमिका मंडळी तर राजन साळवींची नेमकी भूमिका काय असेल ? ते समर्थनार्थ राहणार कि भूमिका बदलणार ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. सत्तापालट झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत मात्र प्रकल्प होण्यासाठी अॅक्शन मोडवर आलेत. 


दिवसभर घडलेलेल्या घडामोडी, पोलिसांचा झालेला अपघात याबाबत रत्नागिरीचे SP धनंजय कुलकर्णी प्रेसच्या माध्यमातून वस्तूस्थिती सांगितली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शांततेच आवाहन केलंय. एकूणच, आतापर्यंत तरी भूमीपुत्रांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र आता आर या पार च्या भूमिकेत विरोधक आहेत. प्रशासनाकडून अद्यापही आंदोलकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे बारसुतलं हे शांत वातावरण तसच राहणार कि ही वादळापूर्वीची शांतता ठरणार हे येणारा काळचं ठरवेल.