श्रावणी रावराणे पोहोचल्या घरोघरी; कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघ पिंजून काढला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 01, 2026 19:04 PM
views 66  views

वैभववाडी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार श्रावणी रावराणे यांनी घरोघरी भेटी देत जोरदार प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती पिंजून काढत त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला असून या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत होत आहे.यामध्ये भाजपाच्या श्रावणी रावराणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. सौ.रावराणे यांनी घरोघरी भेटीदरम्यान  महिलांशी, शेतकऱ्यांशी, युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न तसेच महिलांच्या सक्षमीकरणासंबंधी मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “प्रत्येक गावाचा समतोल विकास हाच माझा ध्यास आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रचारादरम्यान स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून भाजपाच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे. विकासकामांचा लेखाजोखा मांडत आगामी काळात मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही त्यांनी नागरिकांना दिली.

घरोघरी संपर्कामुळे मतदारांशी थेट नाते निर्माण होत असल्याने श्रावणी रावराणे यांच्या प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांची प्रचारातील आघाडी अधिक बळकट होत आहे.