भरवस्तीतून दुचाकी चोरीला !

२ महिन्यात दुचाकी चोरीची चौथी घटना
Edited by: दिपेश परब
Published on: May 31, 2024 14:05 PM
views 138  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात भरवस्ती मधून आज शुक्रवारी संतोष मेस्त्री यांची दुचाकी चोरीस गेली आहे. त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गेल्या दोन महिन्यात दुचाकी चोरी ची ही चौथी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

वेंगुर्ले बाजारपेठेला लागून मेस्त्री यांचे घर आहे. नेहमी प्रमाणे रात्री त्यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली होती. परंतु सकाळी उठल्यावर त्यांना आपली दुचाकी घरा समोर दिसली नाही. त्यांनी आजू बाजूला सर्वत्र पाहणी केली मात्र दुचाकी मिळून आली नाहीं. त्यामुळे त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात जाऊन दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. दोन महिन्यात ही चोरीची चौथी घटना आहे. शहरातील एका हॉटेल समोरील दुचाकी चोरीला गेली दोन दिवसा नंतर ती दुचाकी दाभोली मार्गावर मिळून आली. एका चायनीज मालकांची आणि एका शिक्षिकेची दुचाकी ही चोरीला गेली होती ती सुधा नंतर दुसऱ्या जागी टाकलेल्या स्थितीत आढळून आली. दरम्यान आज पुन्हा एकदा एक दुचाकी चोरीला गेली आहे.

 शहरातील काही सीसीटिव्ही बंद !

सुरक्षिततेच्या दृष्टीने वेंगुर्ले पोलिसांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हे कॅमेरे बसविले आहेत तो उद्देश सफल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तरी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत सुरू करून घ्यावेत अशी मागणी हि नागरिकांकडून होत आहे.