
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील गावांत ऐन काजू हंगामात हत्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. येथे आठ दिवसात या हत्तींचा बंदोबस्त करावा, अन्यथा ७ मार्चपासून येथील वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवळी यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व शेतकऱ्यांनी दिला आहे.
तिलारी खोऱ्यात हत्तींनी धुमाकूळ माजविला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागायतींसह शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अन्नाच्या शोधात हे हत्ती लोक वस्तीतही शिरकाव करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय मनुष्यावर हल्ला चढविण्याच्या अनेक घटनाही यापूर्वी घडले आहे. या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी काजू बागायतीत वावरताना दिसत आहे. मात्र हत्तींचा वाढता वावर पाहता पाहता काजू बागायतीत जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. कारण हत्ती स्वसंरक्षणार्थ हल्ला चढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. येत्या आठ दिवसात वनविभागाने यावर कार्यवाही न केल्यास ७ मार्चपासून येथील वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी दिला आहे.