'कबुलायतदार'वरून श्रेयवादाची लढाई !

मंत्री केसरकरांच्या होमपीचवर राजन तेलींची बॅनरबाजी
Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 21:06 PM
views 190  views

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. त्यामुळे आता याचा आंबोली- गेळेतील लोकांना फायदा होणार आहे. मात्र, यावरुन सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि भाजप पर्यायानं दीपक केसरकर व भाजप समर्थकांत श्रेयवादावरून शितयुद्ध रंगल आहे. त्यात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी लावलेल्या बॅनरनी श्रेयवादाच्या वादाला तोंड फुटलं आहे. 


भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नगरपरिषद समोर बॅनर लावत राज्य सरकारचे जाहीर आभार मानलेत. आंबोली, गेळे कबुलायतदार गांवकर प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मोठा फोटो यावर आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसुलमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नुकतेच शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. 


दरम्यान, माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच मार्गी लागल्याचं सर्वप्रथम वक्तव्य केले होते. त्यानंतर राजन तेली यांनी देखील हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळेच सुटला असल्याचं सांगितलं. यातच हा प्रश्न सुटावा यासाठी स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच सातत्याने पाठपुरावा केला असं मत शिवसेना आंबोली विभाग प्रमुख विलास गावडे यांनी व्यक्त केले. तर भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी याला प्रत्युत्तर देताना केसरकर समर्थकांनी फुकाचं श्रेय घेऊ नये, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व राजन तेली यांच्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असं विधान केलं होतं. यावर केसरकर समर्थक, विलास गावडे यांच्याकडून श्रेयवाद आणून युती सरकारच्या या निर्णयाला वादाचा मुद्दा करू नये, बंटी पुरोहित यांनी आंबोली गावाच्या विषयात पडू नये असा पलटवार केलाय. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित आंबोली, गेळेच्या कबुलायतदार गांवकर प्रश्न मार्गी लागल्यानंतर शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झालेली पहायला मिळत आहे. तर यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचीही एन्ट्री झाली आहे.शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुटला आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याकडे आपण लक्ष देणार नाही, श्रेय घेणार नाही ! मी अनेक वर्षे याचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आता लोकांचा प्रश्न सुटला हे महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर जमीन वाटप होऊन दोन्ही गावांचा विकास व्हावा यासाठी माझा पुढचा प्रयत्न असेल अस विधानं मंत्री दीपक केसरकर यांनी केले.


एकंदरीतच, कबुलायतदार प्रश्न सुटल्यानंतर सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना विरूद्ध भाजपात श्रेयवादावरून संघर्ष पहायला मिळत आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवरच तेलींनी महायुतीच्या नेत्यांचे फोटो लावत बॅनरबाजी केल्यानं आता याला केसरकर समर्थक कसं  उत्तर देणार का ? हे पहावं लागेल.