
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नूतन इमारतीत जिल्हा आरोग्य प्रशासन रुग्ण सेवा सुरू करत नसल्याने बेमुदत उपोषण सुरू केला आहे जोपर्यंत रुग्णसेवा सुरू केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे.
चार वर्षे रखडलेल्या साटेली-भेडशीतील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण करण्यास दिरंगाई करत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेन लोकांच्या हितासाठी प्रशासनाला बाजूला ठेवत गेल्या आठवड्यात लोकार्पण केलं होतं. लोकार्पण करूनही प्रशासन या नवीन सुसज्ज इमारतीतून रूग्णसेवा देत नसल्याने त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू ठेवलं होतं. त्यालाही जिल्हा प्रशासन दात देत नसल्याने अखेर सोमवारपासून बाबुराव धुरी व त्यांच्या टीमने याच नूतन इमारतीत बेमुदत उपोषण सुरू केल आहे. या उपोषणात उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या समवेत संजय नाईक, संदेश राणे, संदेश वरक, दशरथ मोरजकर व अन्य शिवसैनिक सहभागी झाले आहेत.