
देवगड : दक्षिण कोकणची काशी संबोधले गेलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगडहापूस आंब्यां पासून आरास करण्यात आलीहोती .सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वराच्या चरणी हजारो आंब्यांची सजावट या निमित्त करण्यात आली होती.मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली हजारो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.हापूस आंब्याच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेला होता.
कुणकेश्वर, मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्यासाठी स्वखुशीने दिल्या होत्या.यावर्षी सातत्याने वातावरणात होणारे बदल, अति उष्णता यामुळे आंबा पीक कमी आलं आहे.तरीही बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती सजावट करण्यासाठी देवगड हापूस आंबे दिले.दरम्यान, कुणकेश्वर चरणी आंब्यांची आरास गेल्या दहा वर्षांपासून केली जात आहे.
कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. आंबा सजावटीसाठी विशेष प्रयत्न कलाकार अनिकेत पेडणेकर,संकेत चव्हाण, प्रतीक ठुकरुल,दर्शन सुतार,स्वप्निल सुतार,प्रसाद गोडबोले तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य घेतले. अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले की, गेली दहा वर्ष कुणकेश्वर मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावेळी कुणकेश्वर मंदिरामध्ये आंब्याची आरास करण्याचे भाग्य मला लाभले असून माझ्या कलेच्या माध्यमातून ही कुणकेश्वराची छोटी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे सांगितले यामधून देवगडच्या हापूस आंब्याची महती कुणकेश्वर बरोबरच साता समुद्रा पार जात आहे. याचा सार्थ अभिमान असल्याचे देखील यावेळी कलाकार अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले.