
दोडामार्ग : तिलारी धरणाचा कालवा शुक्रवार २४ जानेवारी रोजी फुटल्याने उत्तर गोव्याला जाणारे कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. कालव्याचे पाणी बंद केल्यामुळे याचा फटका अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे साटेली- भेडशी येथील संतप्त शेतकरी महिलांनी आज तिलारी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शुक्रवारी कुडासे कलमी येथे कालव्याला भगदाड पडले. त्यामुळे कालव्याचे पाणी अचानक बंद करण्यात आले. याचा फटका तालुक्यातील अनेक शेतऱ्यांना बसत आहे. ऐन नाचणी, उन्हाळी भात शेती, तसेच कडधान्य अशी अनेक पिके लागवडीच्या वेळी पाणी बंद केल्यामुळे संतप्त साटेली- भेडशी येथील शेतकऱ्यांनी थेट तिलारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी सुरु करण्याची मागणी केली.
जर पाणी सुरु करत नसाल तर आमाची नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. तसेच फुटलेल्या कालव्याची पाहणी देखील त्यांनी केली. यावेळी नम्रता धर्णे, शोभा पडते, सिताबाई धर्णे, सुजता धर्णे, लतिका धर्णे, सुनिता धर्णे, शुभांगी धर्णे, अमोल धर्णे, प्रभाकर राणे यांसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. रविवारी सकाळ पर्यंत पाणी पुरवठा सुरु करू असे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.