आक्षेपार्ह बातम्यांवर राहणार प्रशासनाचे लक्ष

Edited by: संदीप देसाई
Published on: November 05, 2024 14:44 PM
views 182  views

रत्नागिरी :  विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक विशेषतः उमेदवारांच्या समाज माध्यमांवर प्रसिध्द होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या, मजकुरांवर आणि पेड न्यूजवर लक्ष ठेवा, अशी सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिली.

        माध्यम कक्षाला सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेंद्र प्रसाद मीना यांनी काल सायंकाळी  भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.  

        एमएसीएमसी नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी यावेळी चालणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.  सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री पाठक म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या समाज माध्यम खात्यांवर प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मजकुरांवर तसेच पेड न्यूज, आक्षेपार्ह, चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा. उमेदवारांच्या प्रत्येक समाज माध्यम खात्याची वेळोवेळी तपासणी करा.  

          खर्च निरीक्षक श्री. कुमार म्हणाले, उमेदवारांच्या जाहिरात खर्चांवर विशेष लक्ष द्या.  समाज माध्यमांच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा.  पेड न्यूज बाबत विशेष दक्षता घ्यावी.  यावेळी निवडणूक निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.