गावठणवाडी मित्रमंडळाचा उपक्रम कौतुकास्पद !

Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 15:24 PM
views 33  views

सावंतवाडी : गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाचे सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उपक्रम कौतुकास्पद आहे. या मंडळाने विद्यार्थ्यांसह नवोदित कलाकारांच्या उपजत कलागुणांना दीपावली शो टाईमच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मंडळांनी या उपक्रमशील मंडळाचा आदर्श घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी यांनी केले

        

ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या 'दीपावली शो टाइमच्या उद्घाटन प्रसंगी विनायक दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच आत्माराम गावकर, शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, उप तालुकाप्रमुख संजय माजगावकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सगुण गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश परब, समिक्षा गावकर, मनाली गावकर, अस्मिता भगत, बाळा गावकर, राजन नाईक, प्रमोद गावकर, संजय कविटकर, वायरमन समीर सावंत, मास्टर ऑफ क्राफ्टमन सुरेश वरेकर, गुंडू जाधव, मिलिंद म्हापसेकर, शिवसेना शाखाप्रमुख मंगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.

         

यावेळी नारायण राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शिवसेनेच्या माध्यमातून मंडळाच्या उपक्रमांना तसेच गावाच्या विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आत्माराम गावकर यांनी मंडळाची एकजूट कायम राखण्याचे आवाहन करीत आपण मंडळाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. संतोष कविटकर यांनी मंडळाच्या विविध क्षेत्रातील उपक्रमांचे कौतुक केले. बाळा गावकर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या एकोप्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात विनायक दळवी, नारायण राणे, संतोष कविटकर, समीर सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश चव्हाण यांनी तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले. दीपावली शो टाईम च्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या स्थानिकांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.