तत्कालीन पीएसआय लक्ष्मण सारिपूत्र यांची निर्दोष मुक्तता

न्यायालयात खोटा पुरावा दिल्याचा होता आरोप ; अॅड. राजेंद्र रावराणे यांनी केला युक्तिवाद
Edited by:
Published on: March 27, 2025 18:59 PM
views 210  views

सिंधुदुर्ग : जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथील केस नं. १६/१९९५ महाराष्ट्र शासन विरुध्द विजय श्रीधर परब वगैरे ३ भा.द.वि. कलम 302 सह 34 या केसमध्ये तपासिक अंमलदार म्हणून साक्ष देत असताना न्यायालयात आरोपींना शिक्षा व्हावी या हेतूने बनावट व खोटे पुरावे सादर केल्याच्या आरोपातून मालवण पोलीस स्टेशनचे तत्कालीन पी.एस.आय. श्री. लक्ष्मण महादेव सारीपुत्र यांची जिल्हा न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अॅड. राजेंद्र रावराणे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. विलास परब आणि अॅड. विरेश नाईक यांनी सहाय्य केले.

याबाबत हकीकत अशी की, श्री. लक्ष्मण सारीपुत्र हे सन १९९० मध्ये मालवण पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्या कालावधीत दि. ११/०९/१९९० रोजी साळेल, ता. मालवण येथील रात्रौ १०:४५ ते ११:०० च्या सुमारास भाऊ अर्जुन परब यांचा कोयत्याने धारदार शस्त्राने खुन केल्याबाबत मयताचा पुतण्या अरुण हरिश्चंद्र परब याने मालवण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती त्या आधारे भा.द.वि. कलम ३०२ सह ३४ अन्वये पो.र.नं. ३४/१९९० येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासकाम तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक श्री. लक्ष्मण सारीपुत्र यांचेकडे होते. त्यांनी सदर गुन्ह्याचे तपासकाम पूर्ण करुन तीनही आरोपी विरुध्द दोषारोप न्यायालयात पाठविले होते. तद्नंतर केसची सुनावणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जी. डी. तडवळकर यांचे समोर घेण्यात आली होती. सदर केसमध्ये आरोपी तर्फे बचाव पक्षाची बाजू अॅड. बापूसाहेब परुळेकर व अॅड. सत्तार डिगणकर यांनी मांडली होती. सदर केसच्या सुनावणीमध्ये तपासीक अंमलदार म्हणून पी.एस.आय. लक्ष्मण सारीपुत्र यांची साक्ष अ.क्र. १६ येथे नोंदवण्यात आली होती. सदर साक्षीचे दरम्यान सत्र न्यायालयासमोर झालेल्या उलटतपासामध्ये लक्ष्मण सारीपुत्र यांनी तपासकामातील अ.क्र.१) अटक पंचनामा २) हत्यार जप्ती पंचनामा, ३) आरोपीची निवेदने, ४) आरोपीची ओळख परेड पंचनामा ५) प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे दाखल केलेला रिमांड रिपोर्ट आणि स्टेशन डायरी हे कागदपत्र चुकीचे व खोडसाळ केल्याचे उलट तपासात कबूल केले होते. त्याआधारे मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. जी. डी. तडवळकर यांनी खोटे तपासकाम केल्याचे निष्कर्ष काढून फौजदारी प्रक्रिया संहिता ३४० चा आधार घेवून कोर्टाने स्वतः तपासिक अंमलदार श्री. लक्ष्मण सारीपुत्र यांचे विरुध्द भा.द.वि. कलम १९१, १९२, १९३ व १९४ अन्वये मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कोर्टात फिर्याद दाखल केली होती व तदनंतर सदरची केस मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश येथे चालणेकरीता वर्ग करण्यात आली.

सदर केसची सुनावणी मे. जिल्हा न्यायाधिश १ व सत्र न्यायाधिश सिंधुदुर्ग श्रीमती व्ही. एस. देशमुख यांचे कोर्टामध्ये पूर्ण झाली. सत्र न्यायालयात फिर्यादी म्हणून तत्कालीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. जी. डी. तडवळकर यांची साक्ष नोंदवण्यात आली.

आरोपी तर्फे बाजू मांडत असताना सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले देऊन उलटतपासात चुकीची उत्तरे दिल्याने प्रत्यक्ष खोटे कागदपत्र बनविण्याचा गुन्हा शाबित होत नाही. तपासिक अंमलदार सारीपुत्र हे नवीन भरती झालेले आणि अनुभव कमी असलेले पोलीस अधिकारी होते त्यामुळे त्यांच्याकडून गैरसमजूतीने चुकीची उत्तरे देण्यात आली. मात्र त्यांनी कोणतेही खोडसाळ व बनावट कागदपत्र बनविलेले नव्हते. अगर आरोपींना शिक्षा व्हावी या हेतूने खोटी साक्ष न्यायालयाला दिली नव्हती व तसे न्यायालयासमोर देखील शाबीत झालेले नाही. हे व इतर अनेक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणी अंती आरोपीविरोधी दोषारोप सिध्द न झाल्याने न्यायालयाने आरोपी श्री. लक्ष्मण सारीपुत्र यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे अॅड. राजेंद्र रावराणे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. विलास परब व अॅड. विरेश नाईक यांनी सहाय्य केले.