मळगाव येथील बलिदान मासाची २९ व्या पुष्पाने सांगता

Edited by: विनायक गांवस
Published on: March 20, 2026 19:57 PM
views 12  views

सावंतवाडी : मळगाव येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची काल २९ वे पुष्प अर्पण करून सांगता करण्यात आली. या सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेल्या द केरला स्टोरी-२ या चित्रपटाला महिला, युवक-युवतींसह नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास साजरा केला जातो. मळगाव येथे मागील महिनाभर जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या शालेय मैदानात १८ फेब्रुवारीपासून (फाल्गुन शुद्ध प्रतिपदा) या बलिदान मासास प्रारंभ होऊन तो अखंडितरित्या सुरु होता. काल १८ मार्च रोजी (फाल्गुन अमावस्या) या मासाचे २९ वे पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी नेहमीप्रमाणे सायंकाळी छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र, संभाजी महाराजांवर संभाजी भिडे गुरुजींनी रचलेल्या श्लोकांचे पठण तसेच प्रेरणामंत्र आदी कार्यक्रम पार पडले. या ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र व श्लोकांमधून स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक प्रखरपणे अधोरेखित झाली. त्यानंतर रात्री ९.३० वाजता हिंदू महिला भगिनी व तरुणींच्या सामाजिक व वैचारिक जागृतीसाठी द केरला स्टोरी–२ हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटास महिलांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजासमोर उभ्या असलेल्या गंभीर प्रश्नांबाबत सजग राहण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. महिनाभर चाललेल्या या बलिदान मासाच्या कालावधीत मळगाव परिसरात धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जागवत हिंदू समाजातील एकता, सामाजिक जागृती व राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. शिवशंभू ग्रुप, मळगाव यांच्या या राष्ट्रप्रेरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमात सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सुधीर राऊळ, अश्विन गाड, सहदेव राऊळ, अमित नाईक, गजानन दळवी, प्रथमेश राणे, नितीन गावडे, नितेश तेली, संदीप राऊळ, रितेश राऊळ, सिद्धी राऊळ, हर्षिता राऊळ, रुपेश खडपकर आदी सदस्य सक्रीय सहभागी झाले होते.