'त्या' प्रवृत्तीचा उबाठा सेनेकडून निषेध !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 26, 2023 11:54 AM
views 144  views

कुडाळ :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या रस्त्याचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते डिगस येथे भूमिपूजन करत असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धुडगूस घालत शिवसैनिकांना धक्काबुक्की केली. या गुंडशाही प्रवृत्तीचा डिगस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला. बजेट अंतर्गत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ विधानसभ मतदारसंघात 18 कोटीचा विकास निधी मंजूर झाला असून या विकासकामांची भूमिपूजने आम्हीच करणार आहोत. जर यापुढे कोणाला विकासकामांची भूमिपूजने अडवायची असतील तर अडवून दाखवावीत. यापुढे अशाप्रकारे भूमिपूजने अडवायचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ असा इशारा उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी यावेळी बोलताना दिला.

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मठ - कुडाळ - पणदूर - हुमरमळा - जांभवडे घोटगे या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यास शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर सोमवारी सायंकाळी डिगस येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली डिगसमधील शिवसैनिकांनी एकवटत भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन करण्यास विरोध तसेच धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसा फलकही शिवसैनिकांकडून लावण्यात आला आहे. यावेळी डिगस उपसरपंच मनोज पाताडे, युवासेना उपविभाग प्रमुख रूपेश प्रभाकर पवार, युवासेना शाखाप्रमुख रूपेश जिवबा पवार, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत जाधव, रामचंद्र सावंत, युवासेना उपशाखाप्रमुख संदिप कदम, माजी सरपंच दिपक चोरगे, राजू पवार, बाळा पवार, ग्रामपंचायत सदस्य बली पवार, प्रभाकर झोरे, दाजी पवार, संतोष गोसावी, दशरथ गोसावी, पांडुरंग मेस्त्री, नाथा राणे, रामचंद्र सावंत, बंटी राणे, सुनिल जाधव, अविनाश पाटकर, बाळ सावंत, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत म्हणाले की, मठ कुडाळ पणदूर घोटगे या रस्त्याचे काम आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून मंजूर झाले आहे. या रस्ता कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याचे माहीत असतानाही आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी भाजपच्या राणे समर्थक कार्यकर्त्यांनी येथे येऊन धुडगूस घातला. अशाप्रकारचे भ्याड हल्ले आम्हाला नवीन नाहीत. यापूर्वी अनेकदा असे हल्ले आम्ही झेललेले आहेत.  खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा मतदारसंघात सुरू असलेला झंझावात रोखण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते धुडगूस घालून आखत आहेत, परंतू भाजपला आम्ही किंमत देत नाही. डिगस गावात भाजप कार्यकर्त्यांनी जो प्रकार केला, त्याचा निषेध शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. तसा बॅनरही लावण्यात आला आहे असे उपजिल्हाप्रमुख सावंत यांनी यावेळी सांगितले.