आंबोली घाटातून 'तो' मृतदेह काढला बाहेर

घातपाताची शक्यता
Edited by: विनायक गावस
Published on: June 21, 2023 13:05 PM
views 126  views

 सावंतवाडी : आंबोली घाटामध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणापासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे २०० मीटर अंतरावर दीडशे फूट खोल दरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी निदर्शनास आला होता. मात्र, उशीर झाल्याने तो बाहेर काढण्यात यश आले नव्हते. बुधवारी सकाळी आंबोली रेस्क्यू टीमच्या सहाय्याने तो मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेहाची एकूण परिस्थिती पाहता घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरचा मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण निश्चित होणार आहे.


आंबोली येथील घाटाच्या खोल दरीत मंगळवारी सायंकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह निदर्शनास आला होता. त्या ठिकाणी काही कारणास्तव थांबलेल्या ग्रामस्थांना हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी याबाबत आंबोली पोलीस दूरक्षेत्रात खबर दिल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. अंधार होत असल्याने मृतदेह काढण्याची मोहीम बुधवारी करण्याचे ठरले होते.