
दोडामार्ग : "सरकार जेवते तुपाशी, जनता मात्र उपाशी" अशा जोरदार घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात आज दोडामार्ग तालुका अक्षरशः दणाणून गेला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, शासकीय विभागांची निष्क्रियता आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी 'ढोल बजावो' आंदोलन भव्य स्वरूपात पार पडले.
सकाळपासूनच शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय व महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.ढोल वाजवत, सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आंदोलनादरम्यान जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “दोडामार्गातील विकास पूर्णतः थांबलेला आहे. संबंधित विभागांकडून केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात काहीच होत नाही. हे लुटारू सरकार जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरलेले नाही, आणि शिवसेना याचा तीव्र निषेध करते.” तालुकाप्रमुख संजय गवस यांनी सरकारला इशारा देत सांगितले, “आज शांततेत आंदोलन केले, पण जर मागण्या तातडीने मान्य न झाल्यास चतुर्थीनंतर सरकारला हादरवणारे मोठे आंदोलन उभारले जाईल.” या आंदोलनात महिला आघाडी, युवासेना, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, विभागप्रमुख विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, संतोष मोर्ये, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, भिवा गवस, संदेश राणे, प्रदीप सावंत आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
शासनाच्या अपयशाचे फलक आणि बॅनर्स हातात घेऊन घोषणाबाजी करताना प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलन संपल्यानंतरही नागरिकांमध्ये सरकारविरोधी नाराजी कायम होती.या आंदोलनातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तालुक्यातील विकास प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.