'सावंतवाडी'साठी ठाकरे शिवसेना - राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 13:35 PM
views 168  views

सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटल्यास अर्चना घारे-परब यांच्या पाठीशी उभे राहू, तर जागा शिवसेनेला सुटल्यास राष्ट्रवादीनं आपल्यामागे ताकद उभी करावी. अर्चना घारेंचा योग्य तो सन्मान महाविकास आघाडी राखेल असं विधान उद्धव ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं. मात्र, खासदारांच्या या विधानानंतर मतदारसंघातील स्थानिक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सावंतवाडीची जागा शिवसेनेकडेच राहणार, त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघाच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. 

कुडाळ येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितीत असलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्यांना शिक्षण देवूदेत आपण सगळे मिळून योग्य 'कार्यक्रम' करू असं विधान केलं होतं. स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरुद्ध मित्रपक्ष भाजपनंच दंड थोपटलेले असताना कुडाळात भाजप- राष्ट्रवादीच एकमत होताना दिसल. ठाकरे गटाचे नेते आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते देखील या व्यासपीठावर उपस्थित होते. 

तर खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सावंतवाडीची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सुटेल असे संकेत मिळाले. त्यात राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी गेली पाच वर्षे सावंतवाडीत तळ ठोकत पक्ष संघटना मजबूत केली आहे. २०२४ ला राष्ट्रवादीच्या उमेदवार घारेच असणार, २०१९ ची चूक पुन्हा करणार नाही अस खुद्द राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलय. पऱंतु, या कहाणीत ठाकरे गटानं ट्विस्ट निर्माण केला आहे. खासदारांच्या या विधानानंतर मतदारसंघातील स्थानिक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सावंतवाडीची जागा शिवसेनेकडेच राहणार, त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगितलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला तिन्ही तालुक्यांचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाबुराव धुरी, यशवंत परब उपस्थित होते. यातच खासदार विनायक राऊत यांच्या विधानाचं खापर मीडियावर फोडत खासदारांच्या वक्तव्याचा मिडियानं विपर्यास केला. सावंतवाडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं मत जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, मागील २५-३० वर्षांत या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच वर्चस्व राहिलेल आहे. पण, शिवसेनेत फुट पडल्यानं शिंदे आणि ठाकरे गट तयार झाले आहेत. स्थानिक आमदार दीपक केसरकर हे शिंदे सेनेतले बडे नेते तथा मंत्री आहेत. एकीकडे, केसरकरांना घेरण्यासाठी भाजपसह सर्वपक्षांच एकमत होताना दुसरीकडे ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मात्र सुप्त संघर्ष देखिल पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून अर्चना घारेंचा चेहरा पुढे येत असल्यानं वर्षभर आधीच विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.